अमरावती : कोरोनानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावती विभागातील नेते, प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवारी घेण्यात आलेल्या संवाद बैठकीतून निवडणुकीची रणनीती आखली. विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका अथवा नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अव्वल कशी राहील, याचे विचारमंथन झाले. येत्या काळात अमरावतीत दोन दिवसीय शिबिर आयोजनावरही शिक्कामाेर्तब करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणाने जोश भरला, हे विशेष.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या संवाद बैठकीला व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार प्रकाश गजभिये, आमदार राजू तोडसाम, आमदार अमोल मिटकरी, आमदार किरण सरनाईक, एकनाथ खडसे, गुलाबराव गावंडे, माजी आमदार तुकाराम बिडकर, इंद्रनील नाईक, माजी मंत्री सुबोध मोहिते, माजी आमदार संदीप बाजोरिया, माजी विधानसभा उपसभापती शरद तसरे, केवलराम काळे, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, रमेश बंग, माजी आमदार रेखा खेडकर, माजी मंत्री भारत बोंद्रे, गुलाबराव गावंडे, बळीराम शिरसकार, हरिदास भदे, शैलेजा तोटे, सुनील पाटील, दत्ता डहाके, महिला पदाधिकारी सुरेखा ठाकरे, संगीता ठाकरे, सलील देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागीय समन्वयक संजय खोडके यांनी केले. राज्याचे महाविकास आघाडीची सत्ता धोक्यात आणण्यासाठी दरदिवशी नवनवी षडयंत्रे रचत असल्याचा आरोप खासदार शरद पवार यांनी आवर्जून केला. सरकार अस्थिर करण्याचे मनसुबे हाणून पाडा.
वैनगंगेच्या खोऱ्यातील अतिरिक्त पाणी हे नळगंगेद्वारे पश्चिम विदर्भात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी म्हणाले. याबाबत पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आम्हाला यापूर्वी सूचित केले आहे. त्यामुळे येथील सिंचनाचा अनुशेष दूर होणार असल्याचेही ते म्हणाले. सध्या पोलीस अटकेत असलेल्या अनिल देशमुख व मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा त्यांनी निषेध नोंदविला. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसची अमरावती विभागीय संवाद बैठक आयोजित केल्याबद्दल नेते शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदींनी संज़य खोडके यांच्या कार्यावर कौतुकाची थाप दिली. काेरोनानंतर पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांची यशस्वी बैठक झाली, हे विशेष. महाराष्ट्रात सध्या घाणेरडे राजकारण सुरू असल्याची टीका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले. या हल्ल्यामागे भाजप असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्याचा उद्योग भाजपने चालविला असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणारे असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईस्थित ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला चढवला. त्या अनुषंगाने अमरावतीतील पवार यांच्या जाहीर कार्यक्रमावर पोलिसांची करडी नजर होती. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वात डीसीपीद्वय विक्रम साळी व एम. एम. मकानदार, पाचही सहायक पोलीस आयुक्तांची प्रत्येक घडामोडीवर सूक्ष्म नजर होती. एसआरपीएफच्या चार कंपन्यांसह १० पोलीस निरीक्षक, २८ सहायक व उपनिरीक्षक, २१५ पोलीस अंमलदार, ३७ महिला अंमलदार व २० पोलिसांचा समावेश असलेली आरसीपीदेखील तैनात होती.











