यवतमाळ : मार्च एंडींगमुळे शेतमालाचे दर दबावात राहतात. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री थांबविली होती. मार्च एंडिंगनंतर पुन्हा बाजारपेठ उघडताच शेतकऱ्यांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली आहे. ही गर्दी आवाक्याबाहेर गेल्याने बाजार समितीच्या बाहेर रांगा लावाव्या लागल्या. शुक्रवारच्या शेतमालाचा लिलाव शनिवारी करण्यात आला. यवतमाळच्या चिंतामणी खासगी बाजार समितीमध्ये शुक्रवारी सात हजार क्विंटल शेतमालाची आवक होती. यातील पाच हजार क्विंटल शेतमालाची मोजणी शुक्रवारी पार पडली, तर दोन हजार क्विंटल शेतमालाचे मोजमाप शनिवारी करण्यात आले. अतिरिक्त शेतमालाची मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुक्काम करावा लागला. ऑफ सीजनमध्ये अचानक गर्दी वाढल्याचा प्रकार यावर्षी प्रथमच पाहायला मिळाला. बाजारपेठेत सोयाबीनला ७४०० रुपये क्विंटलचे दर मिळाले, तर हरभऱ्याला ४४०० रुपये क्विंटलचा भाव राहिला. सोयाबीन आणि हरभऱ्याचे आवक वाढल्याने गहू, तुरीच्या पिकांची आवक शुक्रवारी थांबविण्यात आली होती.
दरम्यान, सध्या बाजारपेठेत शेतमालास मिळणारे दर चांगले असल्याने शेतकऱ्यांनी बाजारात एकच गर्दी केली आहे. यामुळे बाजारपेठ पुढील काही दिवस हाऊसफुल्ल राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कापसाचे दर १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचले. मात्र, शेतकऱ्यांकडे कापूसच राहिला नाही. यामुळे बाजारपेठेत कापसाचे दर वाढल्यानंतर कापूस गाड्या दिसत नाही. बहुतांश कापूस व्यापाऱ्यांकडे साठवून आहे. त्यांना आणखी दर वाढण्याची अपेक्षा आहे.