महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : आजच्या युगात कमीत कमी खर्चात आणि पारंपारिक पद्धतीने विवाह समारंभ साजरा करणे कोणालाही आवडत नाही. परंतु ऐपत असतानाही कमी खर्चात आणि पारंपारिक पद्धतीने विवाह समारंभ साजरा व्हावा या उद्देशाने येथील विंजासन वार्डातील नेताजी नगरातील अमोल प्रकाश पायघन या युवकाने चक्क दमनीमध्ये बसून आपली वरात काढल्याने त्याचे अभिनंदन केले जात आहे.अमोल प्रकाश पायघन हा युवक व्यवसायाने शेतकरी आहे. त्याच्याकडे ८ ते ९ एकर शेती आहे. त्याचे वडीलही शेतकरीच आहेत. नागपूर जिल्ह्यातील बोरखेडी येथील काजल हरीचंद्र ढोके या युवतीसोबत त्याचे लग्न जुळले. आपण खानदानी शेतकरी असून आपल्या कुटुंबातील सर्व पिढ्यांतील सर्व सदस्यांचे विवाह दमनीने वरात काढूनच झाले. मग आपलीही वरात दमनीनेच निघावी अशी त्याची इच्छा होती. तसेच लग्नात फटाके फोडणे, डीजे वाजविणे, बॅंड वाजविणे या गोष्टी खर्चिक असून विविध प्रकारचे प्रदुषण निर्माण करणा-या आहेत. त्यामुळे आपली घराण्याची परंपरा कायम राहावी आणि पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी अमोल ने अशा साध्या पद्धतीने विवाह समारंभ साजरा केला. हा विवाह समारंभ येथील यश मंगल कार्यालयात नुकताच पार पडला. अमोलचे घर आणि विवाह स्थळ हे जवळपास अर्ध्या कि.मी.चे अंतर आहे. घरापासून ते यश मंगल कार्यालयापर्यंत दमनीवर अमोलची वरात निघाली. त्यासाठी बैलजोडीच्या अंगावर आकर्षक झुली टाकण्यात आल्या. नंदीबैलासारखे बैलांना सजविण्यात आले. तसेच दमनीलाही विविध प्रकारच्या फुलांनी-हारांनी सजविण्यात आले. दमनीत बसलेल्या नवरदेवाला सर्जा-राजाची जोडी रस्त्याने पुढे घेऊन जात होती. त्यांच्यापुढे पारंपारिक पद्धतीने डफळे वाजविणारे दोन वाजंत्री आपल्या डफळ्यांवर ताल धरुन चालत होते. यावेळी अनेकांना आपल्या बालपणी जाणा-या दमनी, बैलबंडीवर जाणा-या वरातींची आठवण झाली.दरम्यान, पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी आणि परंपरा टिकविण्यासाठी अमोलने अवलंबिलेल्या या वरात पद्धतीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.