महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील लोकसेवा मंडळाद्वारे संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बंडू दरेकर हे नुकतेच सेवा निवृत्त झाले असून त्यांना महाविद्यालयाच्या वतीने एका कार्यक्रमात भावपूर्ण निरोप देण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून लोकसेवा मंडळाचे सचिव मनोहरराव पारधे, सहसचिव नामदेवराव कोल्हे, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सदस्य मधुकरराव नारळे, उमाकांत गुंडावार, गोपालराव ठेंगणे, अविनाश पाम्पट्टीवार, संजय पारधे, उपप्राचार्या आशालता सोनटक्के, मावळते प्राचार्य बंडू दरेकर, सौ.मंगला दरेकर, लोकमान्य ज्ञानपीठाच्या प्राचार्या पूनम ठावरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते सरस्वती पूजन करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी लोकसेवा मंडळ, लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व लोकसेवा सहकारी कर्मचारी पतसंस्थेतर्फे प्राचार्य दरेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी सचिन सरपटवार, प्रिया भास्करवार, विशाल गावंडे, प्राजक्ता चिखलीकर, मधुकर सावनकर यांनी मनोगत व्यक्त केले. लोक सेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावर तसेच अन्य सदस्यांनी बंडू दरेकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार मूर्ती बंडू दरेकर यांनी आपल्या सेवेतील आठवणींना उजाळा देत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्या आशालता सोनटक्के यांनी केले. संचालन शिक्षिका प्रतीक्षा खुजे यांनी केले. तर आभार प्रा. वंदना रोडे यांनी मानले. कार्यक्रमाला माजी प्राचार्य तसेच आजी-माजी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.