महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : तालुक्यातील आष्टा येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेत शाळा स्तरिय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करुन राष्ट्रीय विज्ञान दिन नुकताच साजरा करण्यात आला. आजचे युग हे विज्ञानाचे युग असून विज्ञान हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. हेच विज्ञान शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रयोगातून कृतीयुक्त विज्ञान शिकावे या हेतूने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आष्टा येथे शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शनी व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन थोर शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि दीप प्रज्वलन करुन पंचायत समिती सदस्या बेबीताई कारमेंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू ढवळे तसेच प्रमुख अतिथी म्हणून भद्रावती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनपाल फटींग, साधन व्यक्ती छाया खनके व विनोद मून यावेळी उपस्थित होते. स्वागत गीताने व पुष्पगुच्छ देऊन मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मिशन गरुड झेप अंतर्गत तालुकास्तरीय तीन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे उद्घघाटन करून मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रतिकृतीं चे निरीक्षण करून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल भरभरून कौतुक व मार्गदर्शनही केले.किसान विद्यालय आष्टा येथील शिक्षक जांभुळे व भेंडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींचे निरीक्षण व परीक्षण करून उत्तम तीन प्रतिकृतींची निवड केली.या प्रदर्शनीत वर्ग २ ते ७ च्या ३९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विद्यार्थ्यांची विज्ञान विषयाची प्रश्नमंजुषा स्पर्धाही यावेळी घेण्यात आली. त्यात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.सर्व विजेत्या स्पर्धकांना शील्ड व प्रमाणपत्र तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे संचालन मैथिली पडवे या विद्यार्थ्यिनीने इंग्रजी भाषेतून केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप थुल , विज्ञान शिक्षक जगदीश ठाकरे, सहाय्यक शिक्षक राजू लखमापुरे, वंदना तिमांडे, रूपाली बरवड ,संगीता खन्ना आणि नम्रता त्रिवेदी यांनी परिश्रम घेतले.