जुन्या आठवणींना उजाळा देताना भारावून गेले सभागृह
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील लोकमान्य विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा येथील मुरलीधर पाटील गुंडावार मंगल कार्यालयात नुकताच पार पडला.यावेळी तब्बल ४२ वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र आल्याने संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. येथील लोकमान्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी संजय मुर्लीधर गुंडावार, शरद लांबे, रमेश गुंडावार आणि इतर वर्गमित्र हे १९७९-८० या शैक्षणिक सत्रात इयत्ता दहावीत शिकत होते. त्यांच्या मनात आपल्या वर्गमित्रांचा एक सहपरिवार स्नेहमिलन सोहळा व्हावा अशी कल्पना आली. सर्व वर्गमित्रांनी या कल्पनेला होकार दर्शविला आणि दि.२७ फेब्रुवारी रोजी दोन सत्रात हा भावपूर्ण सोहळा पार पडला. लोकमान्य विद्यालय भद्रावती माजी विद्यार्थी परिवार पुनर्मिलन सखा सोहळा असे नाव देण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जि.प.शिक्षक रमेश गुंडावार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बंडू दरेकर, माजी प्राचार्य भास्करराव ताठे, पी.एम.चिडे, ताठे,चिडे, सुखदेव जुनघरे, रजनी पारधे, निरंजन देवगडे, पांडुरंग वरभे, संजय गुंडावार, विजय सातपुते प्रभृती मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी प्राचार्य ताठे आणि चिडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.तसेच जुनघरे यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित न राहु शकलेले सेवानिवृत्त शिक्षक मधुकर पारधे यांनी पाठविलेला संदेश शरद लांबे यांनी वाचून दाखविला. यावेळी माजी विद्यार्थी गणेश बावणे, चंद्रदीप शिंदे,शालिक दानव, निरंजन देवगडे, सुरेश देहारकर यांनी विद्यालयातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सभागृह भारावून गेले होते. तसेच संजय क्षीरसागर यांनी ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ भक्तीगीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. सर्व वर्गमित्रांचे पत्ते व भ्रमणध्वनी क्रमांक असलेल्या एका पुस्तिकेचेही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यिनींनी स्वागत गीत सादर केले. दुसऱ्या सत्रात उपस्थित सर्व वर्गमित्रांनी आपल्या परिवारासह सविस्तर परिचय करुन दिला.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग वरभे यांनी केले. संचालन अनिल प्रांजळे यांनी तर आभार किशोर महालक्ष्मे यांनी मानले. कार्यक्रमाला वर्गमित्र आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.