अमरावती : स्थानिक केशरबाई लाहोटी महाविद्यालयातील बीबीए विभागात गुरुवारी विद्यार्थी परिषद समिती व क्लब समिती स्थापन करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार भांगडीया यांच्या उपस्थितीत योगगुरू अनिल राठी यांच्या शुभहस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी योगगुरू अनिल राठी म्हणाले की, उज्वल भविष्यासाठी परिवर्तनशील जीवनाच्या बदलत्या जीवनशैलीनुसार स्वत:मध्ये बदल केला पाहिजे. यातूनच भारताची उज्ज्वल भावी पिढी घडू शकते. योगगुरू अनिल राठी यांनी भगवद्गीतेचा दाखला देत रागावर नियंत्रण कसे ठेवायचे हे सांगितले आणि रागामुळे माणसाचे शारीरिक आणि मानसिक नुकसान होते. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.भांगडीया म्हणाले की, संस्था व सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करतात, तुमचे भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे. नियमित उपस्थित राहून सर्व सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.