अमरावती : महापालिका क्षेत्रातील प्रत्येक नगरसेवकाने निवडणुकीपूर्वी आपल्या परिसराची विकासकामे पूर्ण करायची आहेत. दुसरीकडे संबंधित अधिकारी ही कामे टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. असे म्हणत एमआयएमच्या संतप्त सदस्यांनी महापालिकेचे विद्युत अभियंता ठोंबरे यांना बांगड्या घालण्याचा प्रयत्न केला. मात्र हालचाली लक्षात येताच अधिकारी आपल्या दालनातून गायब झाले. ताजनगर नाला ते अलकन कॉलनी या रस्त्याच्या सुशोभिकरणासाठी दिवे लावण्याची मागणी एमआयएमचे नेते अब्दुल नाझीम यांनी महापालिकेचे विद्युत अभियंता ठोंबरे यांच्याकडे केली आहे.
सलग दोन महिने ते या संदर्भात प्रयत्न करत होते. मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने नगरसेवक अब्दुल नाझीम संतप्त झाले आणि त्यांनी पालिका अभियंत्याला बांगड्या घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एमआयएमचे कार्यकर्ते बांगड्या घेऊन महापालिकेत पोहोचले. हा प्रकार लक्षात येताच कार्यालयात बसलेल्या अधिकाऱ्याने तेथून अचानक पळ काढला. एकीकडे कामांबाबत असंतोषाचा आवाज आहे, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांवरही कामाचा ताण आहे. असे झाल्यास तक्रार कोणाकडे करावी? असा प्रश्न नगरसेवकांकडून उपस्थित केला जात आहे.











