पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहाराची व्याप्ती वाढली असून या प्रकरणाचे बिहार कनेक्शनही समोर आले आहे. ऑनलाईन पेपर कसे फोडावेत याचे प्रशिक्षण देणारे केंद्रच पाटण्यात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या गैरव्यवहारात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पाटणा येथे प्रशिक्षण घेतले असल्याचा संशय पुणे सायबर पोलिसांना असून त्या दिशेने तपासही सुरू झाला आहे. या तपासात बऱ्याच आरोपींचे देशभरातील पेपरफुटीशीही संबंध असल्याचे समोर आले आहेऑनलाइन प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात देशातील दलालांची साखळी गुंतली आहे. परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या काही तास प्रश्नपत्रिका सर्व्हरवर डाऊनलोड करतात. गैरप्रकार करणारे सर्व्हरच्या गोपनीय क्रमांकात (प्रोग्रामिंग कोड) छेडछाड करून प्रश्नपत्रिका फोडतात. परीक्षा घेणारी कंपनी, परीक्षा केंद्रातील काहीजणांशी संगमनत करून ठराविक क्रमांकाच्या उत्तरपत्रिकेची उत्तरे थेट ऑनलाइन बदलली जातात असे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पात्र उमेदवारांच्या यादीत अपात्र उमेदवारांचे नावे समाविष्ट केली गेली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पैसे देऊन पात्र झालेल्या त्या उमेदवारांनी साक्षीदार व्हावे, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. साक्षीदार न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांकडून 2018, 2019 आणि 2020 मधील टीईटी गैरव्यवहाराचा तपास सुरू आहे. या तपासात तब्बल 9,300 अपात्र उमेदवार दलालामार्फत पैसे देऊन पात्र झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दलालांनी हे पैसे वरिष्ठ अधिकारी तसेच इतरांना पोहचवल्याचेही उघडकीस आले आहे. या प्रकरणात परिषदेचे आयुक्त, तत्कालीन शिक्षण आयुक्त तसेच परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह एका आयएएस अधिकाऱ्यास अटक केली होती. दरम्यान, अपात्र उमेदवारांची यादी सायबर पोलिसांनी शिक्षण विभागाकडे सादर केली असून शिक्षण विभागाने साडेतीन लाख प्रश्नपत्रिकांची पडताळणी करण्यात आली आहे. ओएमआर शीटमध्ये काही ठरवून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली नाहीत.


