अकोला : अकोल्यात भरकटलेल्या लांडग्याने सोमठाणा गावात धुमाकूळ घालून चार जणांना जखमी केल्याची घटना घडली. या लांडग्याला पकडण्यास गेलेले वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्यासह चार जणांवर त्याने हल्ला केला. त्यामध्ये बाळ काळणे जखमी झाले. दरम्यान, वन विभागाने या लांडग्यास पकडून जेरबंद केले. सोमवारी सोमठाणा गावात लांडगा आढळून आला. त्यामुळे, घाबरलेले गावातील नागरिक लांडग्याच्या मागे काठी घेवून धावले. त्यामुळे, हा लांडगा अधिकच चिडला. लांडगा आल्याची माहिती काही जणांनी ताबडतोब मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना दिली. त्यांनी त्वरित सोमठाण गाठले. तोपर्यंत लांडगा शांत झाला होता. या शांत झालेल्या लांडग्याला पकडण्यासाठी बाळ काळणे पुढे सरसावले आणि त्यांनी लांडग्याची मान पकडली, मात्र त्यांचा पाय घसरल्याने आक्रमक झालेल्या लांडग्याने बाळ काळणे यांच्या पायाला तीन ते चार ठिकाणी चावा घेतला. दरम्यान, वनपाल गजानन इंगळे, वनरक्षक एस. एस. तायडे, अनिल चौधरी, चालक यशपाल इंगोले, गजानन मारे यांनी घटनास्थळ गाठले. वन परिक्षेत्र अधिकारी श्री. ओवे यांच्या मार्गदर्शनानुसार व गावातील स्वप्नील भगत, सैफ सय्यद इत्यादी नागरिकांच्या सहकार्याने लांडग्याला जेरबंद करण्यात आले. दरम्यान, बाळ काळणे यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचार घेवून ते परत रेस्क्युसाठी आले. परंतु, तोपर्यंत लांडग्याला पकडण्यात आले होते.