डॉ. अंकुश आगलावे
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.३:-महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या किराणा दुकानातून दारू विक्रीस परवानगी देणे म्हणजे भावी पिढीला व्यसनाधिन करण्याचा डाव असल्याचे मत डॉ. अंकुश आगलावे यांनी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी सोहळ्यात मानगांव येथे व्यक्त केले. श्री. गुरूदेव सेवा भजन मंडळ व श्री गुरूदेव सेवा महिला भजन मंडळ तथा समस्त ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने मानगांव येथे आयोजित वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रसंतांच्या विचाराचा महाविकास आघाडी सरकारला विसर पडलेला आहे. राष्ट्रसंतानी समाज व्यसनमुक्त व्हावा, याकरीता केलेला संघर्ष हा मातीमोल झाल्याचेही डॉ. अंकुश आगलावे यावेळी म्हणाले. सरकारच्या या घातक धोरणामुळे शाळकरी मुलांवर किती परिणाम होईल याचे भान सरकारला नसल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात ग्रामसभेत हा समाजविघातक जुलमी निर्णय सरकारने मागे घेण्यास ठराव मांडून निषेध नोंदविला पाहिजे असेही डॉ.आगलावे यांनी सांगितले.
या महोत्सवाला ग्रामगीताचार्य रूपलाल कावळे, नागो ठाकरे, गंगाधर वांढरे, देविदास वांढरे, पोलीस पाटील वांढरे, तंटामुक्ती अध्यक्ष काकडे, मानगांव सरपंच सुनील खामनकर, अनिल खामनकर, माजी सरपंच देविंदास वांढरे, कीर्तनकार वरंटे महाराज,जि.प. सदस्य वाकडे, सुरज पेंदाम, शालीक मेश्राम महाराज, विठ्ठल येेरेकार व समस्त मानगांववासी उपस्थित होते.


