पुन्हा परीक्षा घेण्याची युवा सेनेची मागणी
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.३:-पेपर झाल्यावर प्रवेशपत्र मिळाल्याने भद्रावती शहरातील खुटेमाटे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विजतंत्री व्यवसायाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याने विद्यार्थ्यांत संतापाची लाट निर्माण झाली असून या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांनी केली आहे. ही बोर्डाची किंवा प्रशासनिक चूक असल्याचा विद्यार्थ्यांचा समज आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे व निलेश बेलखेडे यांनी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.कोरोना प्रादुर्भावामुळे आधिच आय.टी.आय.ची परीक्षा फरकाने झाली. २०२१-२२ मध्ये होणारी विजतंत्री या अभ्यासक्रमाची परीक्षा २८ व २९ जानेवारीला होती. शहरातील खुटेमाटे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विजतंत्री या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी रीतसर परीक्षेसाठी फॉर्म भरला. परंतु परीक्षेच्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने मिळाले नाही. प्रवेश पत्र डाउनलोड होत नव्हते. मात्र हे शेवटपर्यंत प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना मिळाले नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. यात विद्यार्थ्यांची कोणतीही चुक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या प्रकारची चौकशी करावी व वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन सादर करतांना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे, निलेश बेलखेडे, तालुका प्रमुख महेश जीवतोडे, पोलीस पाटील जिल्हा प्रमुख योगेश भेले, कल्याण मंडल युवा सेनेचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.