महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : जोपर्यंत आपल्या समाजात लोकप्रतिनिधी तयार होत नाही, तोपर्यंत आपल्या समाजाचा विकास होत नाही. त्यामुळे माना समाजाने एकत्रित राहायला पाहिजे असे प्रतिपादन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश ऊर्फ बाळुभाऊ धानोरकर यांनी केले. ते येथील माना जमात वधू-वर सूचक मंडळातर्फे स्थानिक स्वागत सेलिब्रेशन सभागृहात आयोजित २६ व्या माना जमात वधू-वर परिचय मेळावा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी माना जमातीचे युवा नेते देविदास जांभुळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय आदिवासी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ वाकडे, केंद्रीय कोअर कमिटी सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी नारायण गजबे, गुलाब नारनवरे, मंडळाचे सल्लागार शंकरराव गरमडे, नगरसेवक चंद्रकांत खारकर आणि मंडळाचे अध्यक्ष संजय गायकवाड आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. खा.धानोरकर पुढे म्हणाले की, दर्जेदार शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणे आवश्यक आहे. त्यामुळे माना जमात वधू-वर सूचक मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येतो, ही एक चांगली गोष्ट आहे. मी जिल्हा प्रमुख असतानापासूनच माना समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याला उपस्थित राहात होतो. मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येत माना समाज बांधव मेळाव्याला उपस्थित राहतात, हे मी स्वतः बघितले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानासुद्धा कोरोना नियमांचे पालन करुन मंडळाने खंड पडू न देता ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल धानोरकर यांनी मंडळाचे अभिनंदन केले. याप्रसंगी खा. बाळुभाऊ धानोरकर यांच्या हस्ते आदिवासी माना जमातीचे आराध्य दैवत माता माणिका देवीच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष देविदास जांभुळे यांच्या हस्ते खा.बाळुभाऊ धानोरकर, विश्वनाथ वाकडे, नारायण गजबे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह
आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपवर-वधूंची सविस्तर माहिती असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही खा.बाळुभाऊ धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शैक्षणिक सत्र २०२०-२१ मधील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, गौरव चिन्ह आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. उपवर-वधूंनी परिचय दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मागील एक वर्षात दिवंगत झालेल्या जमात बांधवांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हजारो जमात बांधवांनी घरबसल्याच ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन बी.पी. हनवते यांनी केले. संचालन रुपचंद धारणे, मनीष केदार आणि अमोल हनवते यांनी केले. तर आभार नंदू दडमल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संजय गायकवाड, शामराव दांडेकर, पुरुषोत्तम घोडमारे, देवराव घरत, राजू बगडे, दत्ता नन्नावरे, मनीष केदार, अमोल हनवते, सचिन नन्नावरे, लिमेश जीवतोडे, राजू जीवतोडे यांनी परिश्रम घेतले.