अमरावती, दि. 31 : जिल्ह्यात आवश्यक पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अनेक कामांना चालना मिळाली आहे. मुख्य रस्ते व पूलांच्या कामांबरोबरच पांदणरस्त्यांच्या कामांनाही गती द्यावी. त्यादृष्टीने प्रशासनाने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आज झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जळका हिरापूर येथे ३ कोटी रुपये निधीतून टाकरखेडा पुसदा रोहणखेडा प्रजिमा रस्त्याची सुधारणा, साऊर येथे दोन कोटी रूपये निधीतून अंजनगाव काकडा पूर्णानगर साऊर शिराळा रस्ता सुधारणा, सोनारखेडा येथे तीन कोटी रुपये निधीतून पूर्णानगर निरुळ गंगामाई रस्ता रामा ३०१ वर लहान पुलाचे बांधकाम, तसेच खोलापूर येथे ५ कोटी ३० लक्ष निधीतून पूर्णानगर निरुळ वाठोडा खोलापूर रामा ३०१ रस्ता सुधारणा आदी कामांचे भूमीपूजन, तर टाकरखेडा संभू येथे 6 कोटी 38 लक्ष निधीतून 33 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले. उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार नीता लबडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, हरिभाऊ मोहोड, जयंतराव देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात रस्ते, पूल, इमारतींच्या अनेक कामांना चालना मिळाली असून, आवश्यक निधीही मिळवून दिला जात आहे. मात्र, त्याचबरोबर, पांदणरस्त्यांची कामे गतीने होणे गरजेचे आहे. विशेषत: खारपाणपट्ट्यातील गावांमध्ये ही कामे प्राधान्य देऊन राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव, बैठका व इतर कार्यवाही नियोजनबद्ध पद्धतीने व गतीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
जिल्ह्यात अनेक विकासकामांचा शुभारंभ झाला. ही सर्व कामे विहित मुदतीत व गुणवत्ता राखून पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्याचप्रमाणे, इतरही आवश्यक कामांबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करावेत. आवश्यक कामांसाठी निधीची उपलब्धता करून दिली जाईल, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.