महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधिभद्रावती
भद्रावती,दि.२९:- गावकऱ्यांच्या मदतीने अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाने जप्त करण्याची घटना आज दि.२९ जानेवारी रोजी सकाळी १०.२० वाजता घडली. प्राप्त माहितीनुसार, भद्रावती तालुक्यातील पारोधी या गावापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या उंबरघाटावर अवैध रित्या रेतीचा उपसा होत असल्याची माहिती पारोधी गावातील नागरिकांना मिळाली. त्यांनी गावच्या सरपंच कल्पना भोंगळे, ग्राम पंचायत सदस्य सुनील बदकी, किसान युवा क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र गेजीक, सामाजिक कार्यकर्ते योगेश्वर आवळे, संतोष कांबळे, गोपिचंद कांबळे, मंगेश शेंडे, मनीष शंबळकर, रमेश झाडे, अमोल घरत, उमेश विरुटकर आणि गावातील इतर नागरिक घटनास्थळी गेले. तेथे रेती उपसा होत असताना दिसताच त्यांनी तहसीलदारांना भ्रमणध्वनीवरुन माहिती दिली. त्यानुसार तलाठी श्रीकांत गिते व कपिल सोनकांबळे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व १ ब्रास अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला. सदर ट्रॅक्टर बोरगांव (धांडे) येथील विकास ईश्वर धांडे यांच्या मालकीचा आहे.