अकोला,दि.26 – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लालबहादुर शास्त्री स्टेडीयम येथे भव्य रांगोळी साकारण्यात आली.राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनीही आज या रांगोळीची पाहणी केली व कलावंतांची प्रशंसा केली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे, नितीन खंडागळे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, आदी उपस्थित होते.
मोक्षता आर्ट ॲण्ड इव्हेंटच्या संचालक अमृता सेनाड व त्यांच्या नऊ सहकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळीव्दारे भव्य प्रतिमा निर्माण केली आहे. सलग बारा तासात साडेपाच हजार स्केअर फुट जागेवर दोन हजार किलो रांगोळीचा वापर करुन रांगोळी साकारली. या भव्य रांगोळीची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डवर झाली असल्याची माहिती अमृता कुशल सेनाड यांनी दिली. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या संकल्पनेतून व निवासी उपजिल्हाधिकार संजय खडसे यांच्या मार्गदर्शनात भव्य रांगोळी साकारण्यात आली असून त्यासाठी जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले यांनी समन्वयक म्हणून काम केले.