अमरावती, दि. 19 : अमरावती जिल्ह्यासाठी सन 2022-23 साठी जिल्हा वार्षिक योजनेत विविध विकासकामांसाठी 320 कोटी रूपये निधीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली.
विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक झाली. अमरावती जिल्ह्याच्या बैठकीला पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
जिल्हा वार्षिक योजनेसाठी अमरावती जिल्ह्यासाठी 260 कोटी 56 लक्ष रूपये नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. जिल्ह्याची मागणी व आवश्यकता लक्षात घेता जादा निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्र्यांनी यावेळी केली. त्यानुसार मंजूर नियतव्ययापेक्षा 60 कोटी निधी वाढवून देण्यात आला. वार्षिक योजनेत 320 कोटी रूपये निधीतून अनेक कामांना चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केला.
दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या वास्तव्याने पुनित झालेली स्थळे, तसेच रिद्धपूरसह विविध स्थळांच्या विकासासाठी नियोजनानुसार तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
नियोजनात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध कामे, रस्तेविकास, ग्रामविकास, शिक्षण, इतर पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश केला आहे. वाढीव निधी मिळाल्याने अनेक कामांना चालना मिळणार आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व इतर योजनांतूनही विविध विकासकामांसाठी निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे, असा विश्वास पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
अमरावती जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजनेत सायन्सस्कोर मैदान विकास, मेळघाटातील तीन गावांत सौर ऊर्जाधारित वीजपुरवठा ही कामे राबविण्यात आली. त्याचप्रमाणे, महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मेळघाट हाट व जे जे स्कूल ऑफ आर्टच्या मदतीने पर्यटन विकासासाठी सौंदर्यीकरण प्रकल्प निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी सांगितले.