अकोला – मोटारगाड्या, मोठ्या मालवाहू वाहनांच्या दळणवळणासाठी महामार्ग तयार करत असतांना शेतकऱ्यांची बैलबंडी, ट्रॅक्टर शेतापर्यंत पोहोचवणे ही आवश्यक आहे. त्यासाठी शेतापर्यंत जाणाऱ्या पाणंद रस्त्यांचे जाळे विकसित करणे आवश्यक आहे, त्यामुळे जिल्ह्याचा विकास परिपूर्ण होईल,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे केले.
जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री पाणंद रस्ते योजने अंतर्गत पाणंद रस्ते तसेच स्मशानभूमी ओटे बांधकाम भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने आज पालकमंत्री ना.कडू यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ.ॲड.किरण सरनाईक, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ.हरीश पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ.नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार,उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमास संबंधित ग्रामस्थ व ग्राम पंचायत पदाधिकारी दूरस्थ पद्धतीने सहभागी झाले होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, या अंतर्गत जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद रस्ते विकास योजना राबविण्यात येत आहे. या आर्थिक वर्षात १०७ कामे हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार १३७ किमी लांबीचे रस्ते तयार होणार आहेत. त्यासाठी एक कोटी २३ लक्ष ३० हजार रुपयांचा निधी तरतूद करण्यात आली आहे.
तसेच , जिल्ह्यात समशानभूमी नसलेल्या ८७ ग्रामपंचायतींमध्ये ११२ समशानभूमी ओटे बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठी ४ कोटी ४८लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी पालकमंत्री ना.कडू म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सुविधांना प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल. येत्या दोन वर्षात जिल्ह्यात पाणंद रस्त्यांचा विकास केला जाईल. त्याच प्रमाणे ज्या ग्रामपंचायतींना स्वतःची कार्यालयाची इमारत नाही त्या ग्रामपंचायतींना इमारत बांधकाम करून देण्याचा कार्यक्रमही हाती घेण्यात येईल,असे पालकमंत्र्यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.