अकोला, दि.१७ – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला व डॉ. बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील एतिहासिक स्थळे, स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची माहिती, स्वच्छता इ. विषयावर भितींवर चित्रकलेद्वारे प्रदर्शित केली जाणार आहे. आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवार भिंतीवर चित्रण करुन या स्पर्धेस आज प्रारंभ झाला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, डॉ. बाबासाहेब ढोणे महाविद्यालयाचे प्रा. गजानन बोबडे आदी उपस्थित होते. या भित्तीचित्र स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ७५ चित्रकार व चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या स्पर्धेत शहरातील मुख्य दर्शनी भागातील भिंतींवर स्वातंत्र्य संग्रामातील शिलेदार, प्रमुख घटना, स्वच्छतापर संदेश, पर्यावरण, जिल्ह्यातील महत्वाचे स्थळे अशा विविध विषयाचे चित्रण केले जाणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट चित्रनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यात प्रथम पारितोषिक पाच हजार, व्दितीय पारितोषिक चार हजार व तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये आहे. या स्पर्धेला चित्रकार बाळ व हिंगणघाटचे चित्रकार हेमंत मोहड हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.