अकोला, दि.२५ – अकोला शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अकोला शहरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ जारी करण्यात आले असून लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीत दि. २७ पर्यंत वाढ करण्यात आले असल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी काल (दि.२४) निर्गमित केले. तथापि, संचारबंदीचा कालावधी रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत असा करण्यात आला आहे.
यासंदर्भात निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार, दि.२७ रोजी पर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. संचारबंदीचा कालावधी रात्री दहा ते सकाळी पाच असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. याकालावधीत आरोग्य सेवा सुरु राहतील. तसेच या कालावधीत धार्मिक तेढ वाढविणारे, भावना भडकविणारे असे कृत्य. वक्तव्य, अफवा पसरविण्यास मज्जाव करण्यात आला आहे. समाज माध्यमांद्वारे असे संदेश प्रसारित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे रॅली, धरणे, मोर्चे व अन्य कार्यक्रमांचे आयोजन होणार नाही. निवडणूक प्रचार संबंधित कार्यक्रम असल्यास त्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या कालावधीत कोविड-१९ लसीकरण सत्र पुर्ण क्षमतेने सुरु राहिल. या आदेशाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.