अकोला, दि.14 –सामाजिक माध्यमाव्दारे प्रसारीत होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता जिल्ह्यात शांतता राखावी व त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज शांतता समितीच्या बैठकीत केले.
त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था अबाधित रहावी यासाठी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरीया, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक मिरा पागोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरिक्षक यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखून शांततेचा भंग होवू नये याकरीता शांतता समितीतील सदस्यांनी जिल्ह्यात एकोपा व शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे. व्हॉट्सॲप सारख्या समाज माध्यमांव्दारे प्रसारीत होणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नका. अशा संदेशाना प्रसारीत करु नका. अशा संदेशाचे प्रसारण करणाऱ्यावर सक्तीने कायदेशीर कार्यवाही करा. जिल्ह्यात शांतता अबाधित ठेवण्याकरीता पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यावेळी दिले.
यावेळी पोलीस अधीक्षक जी श्रीधर म्हणाले की,जिल्ह्यात अनुचित घटना घडणार नाही याकरीता प्रशासन सज्ज असून शांततेचा भंग करणे, अफवा पसरवणे आदि प्रकार घडविणाऱ्या असामाजिक तत्वावर, गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल. शांतता समितीतील सर्व सदस्यांनी जिल्ह्यात शांतता राहिल याकरीता सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी यावेळी केले.