जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर/लातूर शहर महानगरपालिका यांच्या पुढाकाराने अशोका कंपनीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या घरगुती गॅस लाईनच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शनिवारी ( दि.१६ )पार पडला.अशा प्रकारे पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस पोचवणारे लातूर हे मराठवाड्यातील पहिले तर राज्यातील केवळ सातवे शहर ठरणार आहे.घरगुती गॅस सोबतच आता गॅसवर आधारित उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत मत पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले.
अशोका गॅस कंपनीच्या वतीने शहरात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे.या प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते.राजीव गांधी चौक येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले.महापौर विक्रांत गोजमगुंडे,उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,विरोधी पक्षनेते दीपक सुळ,कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड.किरण जाधव,नगरसेवक अशोक गोविंदपुरकर,रविशंकर जाधव,आयुब मणियार,सचिन मस्के यांच्यासह कॉंग्रेसचे प्रदेश सचिव गोरोबा लोखंडे, संजय निलेगावकर, युनूस मोमीन, असिफ बागवान, रघुनाथ मदने, कंपनीचे प्रकल्प समन्वयक शैलेश नखाते यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की,’जे जे नवं ते लातुरला हवं’ हे स्व.विलासराव देशमुख साहेब यांचे वाक्य आता ब्रीदवाक्य झाले आहे.
सोलापूर,नांदेडच्या अगोदर लातुरात मोबाईल सुरू झाला होता.पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याचेही तसेच आहे.सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत असतो.शहरातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्यासाठी मनपाने कोणालाही अभिप्रेत नसणारे पाऊल उचलले आहे. यामुळे महागाईच्या काळात सामान्य नागरिकांचे पैसे वाचणार आहेत. मनपाने शहरातील प्रत्येक घरात पाईपलाईनद्वारे गॅस उपलब्ध होण्याची व्यवस्था करावी. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे.त्यामुळे शहरालगतच्या गावातही गॅस पुरवठा करता यावा याचा आराखडा तयार करावा.गॅस बेस इंडस्ट्री लातूरमध्ये येऊ शकतात.त्यासाठी प्रयत्न करावेत,असे ते म्हणाले.
स्व.विलासराव देशमुख यांनी शासकीय रुग्णालयाचा कायापालट केला.या रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करून खाटांची संख्या ३०० वरून १२०० पर्यंत नेली.त्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांना दिलासा मिळू शकला.शहरातील नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी गाव भागात नवे रुग्णालय बांधले जाणार आहे.मनपाकडे डॉक्टरांची कमतरता आहे.ती दूर करण्यासाठी शहर दत्तक घेऊन डॉक्टर उपलब्ध करून देऊ.शहराप्रती असणाऱ्या उत्तरदायित्वा मुळे गल्लीबोळातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास आपण कटिबद्ध असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
गावभागातील जुनी जलवाहिनी बदलून तेथे नवी जलवाहिनी टाकली जाणार आहे.पालिकेच्या वतीने महिला व विद्यार्थ्यांना सिटीबसने मोफत प्रवास उपलब्ध करून दिला जाणार आहे.असा उपक्रम राबवणारी लातूर ही राज्यातील एकमेव पालिका आहे.प्रत्येक प्रभागात भाजीमंडई सुरू केली जाणार आहे.भाजी मंडई साठी प्रसंगी आरक्षणात बदल करावेत,असेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी सूचित केले.
आगामी काळात शहरातील प्रत्येक प्रभागात विकास कामे सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.विकास कामे केली जाणार असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूरचा विकासाच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले.स्व.विलासराव देशमुख यांचे स्वप्न पालकमंत्री अमित देशमुख पूर्ण करत आहेत.स्व. देशमुख यांनी विकासाचे मंदिर बांधले.त्याच्यावर कळस चढविण्याचे काम अमित देशमुख करत आहेत. पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करणारे लातूर हे मराठवाड्यातील पहिले तर राज्यातील केवळ सातवे शहर आहे.यामुळे नागरिकांचे २०० ते २५० रुपये वाचणार आहेत. मनपा पारदर्शक पद्धतीने काम करत आहे. विकासाच्या उद्योगांना लाल गालिचे अंथरले जात आहेत. पायाभूत सुविधा असतील तरच शहराचा विकास होतो. शहरातील नागरिकांना दिलासा देणाऱ्या योजना राबतानाच सर्वांना सोबत घेऊन विकासकामे करणे ही पालकमंत्र्यांची भूमिका असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री अमित देशमुख यांच्यामुळे राज्यातील जनतेला कोरोनाकाळात दिलासा मिळाला.राज्यात तपासणीसाठी केवळ एक लॅब असताना संख्या वाढवण्यात आली.आज राज्यात एक हजाराहून प्रयोगशाळा कार्यरत आहेत,असेही ते म्हणाले. प्रारंभी अशोका गॅसच्या वतीने प्रकल्प समन्वयक शैलेश नखाते यांनी प्रकल्प उभारणी मागची भूमिका विषद केली.अशोका गॅसकडे १७६ जिल्ह्याचे काम आहे. त्यापैकी प्रत्यक्षात काम सुरू होणारा आणि पारदर्शक कारभार असणारा लातूर लातूर हा एकमेव जिल्हा असल्याचे ते म्हणाले. कंपनीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुपर्ण जगताप, नागसेन कामेगावकर यांच्यासह नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.











