जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातूर : आज आपल्या महात्मा बसवेश्वर महाविध्यालयात माझा आपण जो सत्कार केला त्याकडे मी एक जबाबदारी म्हणून पहातो असे भावोद्गार निलेश श्रीकांत गायकवाड यांनी व्यक्त केले.येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेमध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील माजी प्राचार्य तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.श्रीकांत गायकवाड यांचे सुपुत्र निलेश श्रीकांत गायकवाड यांनी 629 रॅक घेवून नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे यांच्या हस्ते शाल, ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. याप्रसंगी वडील डॉ.श्रीकांत गायकवाड व आई प्रा.अनिता गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला. पुढे बोलतांना निलेश श्रीकांत गायकवाड म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाशी माझे भावनिक ऋणानुबंध आहेत. माझे वडिल येथे प्राध्यापक असल्यामुळे मी अनेकदा येथे रममाण झालो आहे. विद्यार्थ्यांनी ‘मी हे करू शकतो’ या जबरदस्त जाणिवेतून प्रत्यक्ष सक्रिय बनले पाहिजे. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत राहिल्यास निश्चितच यश प्राप्त होऊ शकते. यामध्ये अडथळे तर येतच असतात त्यावर मात करताना सर्वस्वी झोकून देऊन वाटचाल करणे गरजेचे ठरते, मी खेड्यातुन आलो आहे, गरीब आहे हा न्यूनगंड मनात बाळगता कामा नये,असेही ते म्हणाले.
यावेळी उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव, समाजकार्य विभाग प्रमुख डॉ.दिनेश मौने, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.संजय गवई, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.यशवंत वळवी, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.भास्कर नल्ला रेड्डी, प्रा.गुणवंत बिरादार, प्रा.व्ही.जी.स्वामी, डॉ.टी घन:श्याम यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


