पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
औसा लातुर : हरियाणामधील रोहतक येथे नुकत्याच झालेल्या सातवी विद्यार्थी ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धा २०२१ मध्ये येथील तुळजाभवानी माध्यमिक विद्यालयाची १५ वर्षीय विद्यार्थिनी धनश्री दिगंबर तळेकरने सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय पातळीवर लातूरचा नावलौकिक वाढविला. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्टुडंटस् ऑलिम्पिक असोसिएशन, हरियाणा यांच्या वतीने रोहतक येथे १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान सातवी विद्यार्थी ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत धनश्रीने राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. या अगोदर तिने पनवेल येथे ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १५ वर्षे वयोगटातून सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर तिची रोहतक येथे होणा-या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेतही तिने लौकिकास साजेसी कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावून लातूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. धनश्री तळेकर ही हिप्परगा (ता. औसा) येथील रहिवासी असून, एका छोट्याशा गावातून येऊन तिने अत्यंत कमी वयात कुस्ती क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करून गावची पर्यायाने जिल्ह्याची शान वाढविली आहे. तिच्या घरात कुस्तीची परंपरा आहे. आजोबा दत्तू तळेकर यांनी स्वत:ला कुस्तीत वाहून घेतले होते. त्यांनी गावच्या तालमीत अ्ननेक मल्ल घडविले. घरातील कुस्तीची परंपरा पुढे चालवत धनश्रीने थेट राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून आजोबाचे स्वप्न साकार केले. माझ्यासाठी हा परमोच्च आनंद असल्याचे आजोबा दत्तू तळेकर यांनी सांगितले.


