महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.११ :- तालुक्यातील मुधोली आणि परिसरातील नागरिकांना कामानिमित्य चंद्रपूरला जाताना मोहुर्ली मार्गे जावे लागत असून या मार्गावर अनेक ठिकाणी गतिरोधके असल्याने अनेक अपघात झाले आहेत.त्यामुळे ही गतीरोधके त्वरीत हटविण्यात यावीत, अशी मागणी मुधोली आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.मुधोली-मोहुर्ली मार्गावर अनेक गतीरोधके असल्यामुळे लोकांना त्रास होत आहे. तसेच अनेक लोकांचे अपघात झाले आहेत.नुकताच दि.१० सप्टेंबर रोजी मुधोली येथील पुंडलिक राणे व त्यांची पत्नी रेणुका हे चंद्रपूरवरुन मुधोलीला परत येत असताना त्यांच्या दुचाकीला गतीरोधकामुळे अपघात झाला. त्यात रेणुका(५२) यांच्या डोक्याला व छातीला मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना चंद्रपूर येथील मेहरा हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले आहे. गतीरोधके हटविण्यासंदर्भात वनविभागाकडे वारंवार पाठपुरावा करुनही वनविभागाने अद्याप दखल न घेतल्याने अपघाताची शृंखला चालुच आहे. त्यामुळे मुधोली परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.











