महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.20:-राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दि.२० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी पर्यंत ग्रामीण भागाकरीता राबविण्यात आलेल्या महा आवास अभियानाचा पुरस्कार वितरण सोहळा येथील पंचायत समितीच्या सभागृहात नुकताच थाटात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे सभापती प्रवीण ठेंगणे मंचावर उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर, जि.प.सदस्या अर्चनाताई जीवतोडे, गट विकास अधिकारी डाॅ.मंगेश आरेवार, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता राकेश तुरारे, मिलिंद नागदेवते, विसरणार अधिकारी (सांख्यिकी) सुभाष बांदुरकर, नितीन वेलपुलवार उपस्थित होते. यावेळी आ.प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करुन त्यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) उत्कृष्ट घरकुल प्रथम पुरस्कार दिवाकर शेंडे रा.आष्टा, द्वितीय पुरस्कार गणपत कारेकर रा. तिरवंजा, तृतीय पुरस्कार विजय पेटकुले रा.आष्टा,राज्य पुरस्कृत आवास योजना (ग्रामीण) – उत्कृष्ट घरकुल प्रथम पुरस्कार श्रीधर जांभुळे रा.चंदनखेडा,द्वितीय पुरस्कार रुपेश ढोके, रा. मानोरा (सिं.), तृतीय पुरस्कार संगीता चंदनवार रा. टाकळी, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) उत्कृष्ट ग्राम पंचाय प्रथम पुरस्कार ग्राम पंचायत मोहबाळा, द्वितीय पुरस्कार ग्राम पंचायत कुचना, तृतीय पुरस्कार ग्राम पंचायत काटवल (तु.), राज्य पुरस्कृत आवास योजना (ग्रामीण) उत्कृष्ट ग्राम पंचायत प्रथम पुरस्कार ग्राम पंचायत वडाळा (तु.),द्वितीय पुरस्कार ग्राम पंचायत आष्टा, तृतीय पुरस्कार ग्राम पंचायत मानोरा (सिं.) यांचा समावेश आहे. ज्या पात्र घरकुल लाभार्थ्याकडे बांधकामाकरीता स्वत:ची जागा उपलब्ध नव्हती, अशा लाभार्थ्यांना शासनाकडून मोफत जागा उपलब्ध करुन देणे. तसेच अतिक्रमण असलेल्या लाभार्थ्यांना अतिक्रमण नियमानुकूल करुन देऊन त्याद्वारे जागा उपलब्ध करुन देणे. याकरीता भटाळी ग्राम पंचायतचे सरपंच सुधाकर रोहनकर आणि ग्रा. पं. सचिव जोगी तसेच चंदनखेडा ग्राम पंचायतचे सरपंच नयन जांभुळे आणि सचिव नाईकवार यांनी विशेष परीश्रम व शासन दरबारी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थींना घरकुल बांधकामाकरीता लागणारे साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये त्यांना बांधकाम साहीत्याची ने-आण करण्यासाठी आर्थीक भुर्दंड सोसावा लागतो. त्यांची अडचण दूर करण्यासाठी आष्टा येथील महीला शक्ती ग्राम संघातील महीलांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील पहीले असे घरकुल मार्ट उभारुन लाभार्थींना घरकुल बांधकामाकरीता लागणारे साहीत्य पुरविले. यासाठी ग्राम संघाच्या अध्यक्षा उषा शेंडे व इतर महीला यांचा मा. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता पंचायत समिती अंतर्गत इतर अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.