स्वरूप गिरमकर
ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : पालक आणि मुलांमध्ये मन मोकळा संवाद होणे गरजेचे आहे.संवादामुळे नात्यातील लवचीकता, आपापसातील संबंध आणि पुन्हा उभी राहण्याची जिद्द ही ताणतणावापासून दूर ठेवण्यास मदत करते. आई – बाबांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या वाईट घटना मुलांना सांगितल्या पाहिजेत. त्यामुळे मुलेही वाईट गोष्टी पालकांना उघडपणे सांगतील. या मुळे कोणताही पाल्य आत्महत्येच्या निर्णयापर्यंत जाणार नाही. मुलांचा घरातील लहान मोठ्या निर्णयात सहभाग असायला हवा. त्याला काही समजत नाही असे म्हणून चालणार नाही. प्रत्येक निर्णयात त्यांचे मत जाणून घेतले पाहिजे. पालकांनी घरात असताना मुलांसमोर एकमेकांना ओरडू नये किंवा वाईट बोलू नये. यामुळे आई बाबा एकमेकांना आदर देत नाही हे पाहून त्यांच्या मनातील पालकांबद्द्लचा आदर कमी होण्याची शक्यता असते. आई बाबांनी लहानपणापासूनच प्रत्येक मुलाला नकार पचवण्याची सवय लावायला हवी. मुलांनी केलेला हट्ट लगेच पूर्ण करू नये. त्यांना छोटे दु:ख सहन करण्याचा अनुभव देणे तितकेच गरजेचे आहे. त्याचबरोबर आहे ती परिस्थिती त्यांना स्वीकारता यायला हवी. नकार स्वीकारण्याची सवय असेल तर मुले खचून जाणार नाही आणि यामुळे आत्महत्या या मार्गाचा अवलंब करणार नाही. पालकांनी आपल्या मुलांची तुलना इतरांशी करू नये. तसेच राग व्यक्त करत असताना मारणे किंवा टोमणे देणे टाळावे. त्याऐवजी संवाद साधून त्याला गोष्टी समजावणे अधिक फायदेशीर ठरेल.मुलांना एकत्र कार्यपद्धती शिकवायला हवी. भविष्यात काम करताना सहकार्यांबरोबर चांगले संबध प्रस्थापित करता यायला हवे. १४ ते १९ या वयोगटात मुलांचे पहिले प्रेम हे तुमचा अभ्यास असला पाहिजे. रंगरूपावरून विद्यार्थ्यांमध्ये नेहमी चर्चा होत असते. तुम्ही जसे आहेत तसे स्वत:ला स्वीकारायला हवे. तसेच आपली चूक झाली तर ती मान्य करायला हवी. झालेली चूक ही सविस्तर संवाद साधून सुधारता येते. विद्यार्थ्यांनी स्वत:ची अभियोग्यता चाचणी करावी. अभ्यासाचे नियोजन करावे. तुमचा प्रत्येक दिवस हा आनंदाने सुरू करा. आपण भारतात जन्मलो हे आपले भाग्य आहे. भारतीय पालकांच्या संस्कारांमुळे आपले भारतीय जगभर चमकदार कामगिरी करताना दिसतात. नेहमी आनंदात राहून काम करत रहा. याचमुळे आयुष्यात पुढे जाता येते.