तुकाराम पांचाळ करखेलीकर ग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद
आमदार राजेश पवार यांचे पावसाळी अधिवेशनात सरकारला साकडे धर्माबाद-भारत देश हा आज घडीला कितीही प्रगत होत असला तरी देशात आज सरळ सरळ ग्रामीण व शहरी असे दोन भाग पडतात. या दोन्हीही भागात प्रचंड विषमता दिवसागणिक निर्माण होत असून ग्रामीण व शहरी विषमता दूर करायची असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज असल्याची मुद्देसूद मांडणी आपल्या भारदस्त आवाजात नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार यांनी पावसाळी अधिवेशनात केली. आमदार राजेश पवार हे पावसाळी अधिवेशन आटोपूण नुकतेच नायगाव मतदार संघात आले. पावसाळी अधिवेशनात 3 जुलै 4 जुलै 11 जुलै आणि 12 जुलै या दिवशी आमदार राजेश पवार यांना आपल्या मतदार संघातील समस्या सभागृहात मांडण्याची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. ग्रामीण व शहरी विषमतेचा दांडगा अभ्यास त्यांना आपल्या मतदारसंघात फिरताना झाला. शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातील सर्व समस्यांचा त्यांनी उहापोह करताना शेतकऱ्यांचा मातीमोल विकला जाणारा कापूस व सोयाबीन व त्यावर काय उपाययोजना? तद्वतच शेतकऱ्यांचा लग्नाचा किंवा धार्मिक कार्यक्रमाचा मोठा खर्च वाचवण्यासाठी प्रत्येक गावात सभा मंडप बांधण्यात यावे ही मूलभूत समस्या त्यांनी मांडली. व पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता विरोधक कसे हाणून पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत हे सांगत अगोदरचे शासन कर्ते हे फक्त माझे कुटुंबच माझी जबाबदारी ही भूमिका पार पाडत जनतेला वाऱ्यावर सोडले होते. तद्वतच त्यांना कुठलेही जनतेच्या हिताचे अभिनव उपक्रम राबवता आलेले नाही असा घनाघात त्यांनी केला. पन्नास वर्षाच्या काळात लोकप्रतिनिधी बरोबर जनताही विकास म्हणजे काय हे विसरलीच होती. त्यामुळे आज घडीला जो विकास होत आहे तो विरोधकांना पाहवत नाही. तरीपण शेतीविषयक बोलायचं असेल तर शेतीतील पानंद रस्ते हे मजबूत होणे गरजेचे असून सदरील रस्त्याला नंबर देऊन कालबद्ध कार्यक्रम आखून त्या रस्त्याचे मजबुतीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तद्वतच जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था, अंगणवाडीची समस्या सांगत असताना धर्माबाद तालुक्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख करत हे शहर तेलंगाना सीमेवर असून विकासापासून वंचित राहिलेले असून आज घडीला येथे औद्योगिक वसाहत होणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. वीज वितरण कंपनीचे लोमकळत असलेले वायर व वाकडे झालेले पोल याविषयी त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. व पोटतिडकीने प्रत्येक जातीतील समस्या निराकरण करणे कसे महत्त्वाचे आहे व त्यासाठी विरोधक जातीयतेचे तेढ कसे निर्माण करीत आहेत असे सांगत मातंग समाजातील अ ब क ड या अनुसूचित जाती प्रवर्गातील मागणीची दखल घेण्यात यावी असेही सभागृहांना विनंती केली. 293 हा शेतकऱ्यांसाठीच मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर मत मांडताना पुन्हा एकदा ग्रामीण व शहरी विषमता दूर करण्यासाठी काय करता येईल याचं अनेक उदाहरणे देत आज प्रत्येक कुटुंबात विभागणी होत असल्यामुळे अल्प होत असलेली शेती, पेरण्यासाठी त्यांची लगबग, आलेली सुगी, व सुगी बाजारात गेल्यावर व्यापाऱ्यांकडून व संबंधित अधिकाऱ्याकडून मिली भगत द्वारे होत असलेली लूट अशा पार्श्वभूमीवर लग्न आणि दवाखान्याचा फटका जर बसला तर आयुष्यात कधी न भरून निघणारी आर्थिक तूट ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या नशिबी ठरलेलीच असून आज घडीला बहुतांशी खेड्यात रस्ते नाली नाहीत, शाळेला खोल्या नाहीत, शौचालेय नाहीत, खेळांसाठी मैदानं नाहीत या सर्व समस्येवर निराकरण करण्यासाठी प्रशासनातील ग्रामसेवक व तलाठी गावात कधी येतच नाही हे सांगत पिक विमातील जाचक अटी मध्ये सुधारणा करणे गरजेचे असून या सर्व परिस्थितीला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे ही काळाची गरजेचे असल्याचे त्यांनी सभागृहापुढे अतिशय अभ्यासपूर्ण व गंभीरपणे पद्धतीने मांडले.आमदार राजेश पवार यांचे पावसाळी अधिवेशनातील चार वेळेसचे भाषण अख्या नायगाव विधानसभाने आवर्जून ऐकत त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव आज घडीलाही करत आहेत.