राहुल दुगावकर,तालुका प्रतिनिधी, बिलोली
बिलोली: नरसी ते बिलोली या २१ कि.मी. अंतरावर तब्बल ४५ गतिरोधक असल्याने हे अंतर पार करण्यास ४५ मिनिटे लागतात. त्यामुळे वाहनचालकांना व प्रवाशांची गौरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावरील गतिरोधक कमी करण्याची मागणी संघर्ष मालक चालक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. नांदेड- नरसी डिचपल्ली हा महामार्ग हैदराबाद येथे जाण्यासाठी अगदी जवळचा आणि सरळ मार्ग आहे. या मार्गाबरील नरसीपर्यंतच्या रस्त्यावर गतिरोधकांचे प्रमाण कमी आहे. परंतु याच मार्गावरील नरसी ते बिलोली या २१ कि.मी. अंतरावर तब्बल ४५ गतिरोधक असल्यामुळे हे अंतर पार करण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.गतिरोधक उभारण्यासाठी इंडियन रोड सायन्स निकषांची अंमलबजावणी आवश्यक आहे. गतिरोधक कसा उभारावा, एकाच रस्त्यावर दोन गतिरोधक उभारताना त्यात किती अंतर असले पाहिजे, त्यांची उंची किती असावी, याबाबत निकष ठरवले गेले आहेत. गतिरोधक उभारल्यावर त्यावर थर्मी प्लास्टिक पेन्ट पट्ट्या, पांढरे पट्टे काढणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नसावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याने रबलिंग पद्धतीचे गतिरोधक उभारण्यात यावेत, असा निकष आहे. गतिरोधक उभारताना या गतिरोधकांची उंची अडीच ते दहा सेंटिमीटरपर्यंत, लांबी 3.5 सेंटिमीटर, वर्तुळकार क्षेत्र 17 मीटर असायला हवे. गतिरोधकावर गाडी आदळल्याने शरीराला मानेच्या मणक्यासह, पाठीला नाजूक भागास त्रास होतो. अचानकपणे दणका बसल्याने मज्जारज्जू दुखावला जातो. पाठदुखी, मानदुखीच्या तक्रारी वाढतात. मणक्याची गादी सरकणे, सायटिका, वयस्क माणसांची हाडे ठिसूळ असल्याने ती मोडणे असे प्रकार आढळून येतात. अशा तक्रारी घेऊन येणारे बरेच रुग्ण आढळून येता. तसेच शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक न उभारल्याने याचा फटका वाहनांना बसत आहे. ऑडल सील लिक होऊन शॉकप्सर खराब होतात. दणके बसून इतरही स्पेअरपार्टस खराब होऊ शकतात. उंच गतिरोधकांवर कारचे चेंबर धडकून मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. या मार्गावरील सर्व गतीरोधक काढून टाकावेत अशी मागणी संघर्ष मालक चालक संघटनेने सार्वजनिक विभागाकडे केली आहे.


