राहुल दुगावकर,तालुका प्रतिनिधी, बिलोली
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्निक्षण कार्यक्रमा निमित बिलोली तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांच्या उपस्थितीत राजकीय पक्ष पदाधिकारी, पत्रकारांची बैठक मंगळवारी पार पडली. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने १ जुलै २०२४ या अर्हत दिनांका आधारे मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त कार्यक्रम जाहीर केला आहे. दि.२५ जून ते २४ जुलैपर्यंत ही विशेष मोहिम चालू राहणार आहे. या कालावधीमध्ये नवमतदारांची नोंदणी केली जाईल, मयत, मतदार कायमस्वरुपी स्थलांतरीत झाला त्याची वगळणी केली जाईल, मतदान ओळख पत्रावरील जुना किंवा अस्पष्ट फोटो बदलणे, नावामध्येही दुरुस्ती असेल तर तेही करण्यात येईल. त्याच बरोबर मतदार केंद्राच्या सुसुत्रीकरण म्हणजे एका कुटूंबातील आई, वडील एका मतदान केंद्रावर असतील, मुलाचे नाव दुसऱ्या केंद्रावर तर सुनेचे नाव चौथ्याच केंद्रावर असेल तर अशा सर्व एकाच कुटूंबाना देखील एकञ आणता येणार आहे. जेणेकरुन त्या कुटुंबाची गैरसोय होणार नाही. साधारणतः हा प्रश्न फक्त शहरामध्ये प्रामुख्याने मतदानाच्या दिवशी निर्माण होत असतो तसेच मतदार जर मयत असला तर सक्षम पुरावा असल्या शिवाय ७ नंबरचा फॉर्म भरु नये अशाही सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रारुप मतदार यादी २५ जुलै, २०२४ ला प्रसिद्ध केल्या जाईल, तदनंतर पुराव्यासह दावे, हारकती दाखल करण्याची ९ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुदत रहाणार आहे १९ ऑगस्ट रोजी हारकती बाबत सुनावनी होऊन २० ऑगस्ट २०२४ रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी गिरी यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या वतीने नवमतदार नोंदणीपासुन ते दुरुस्ती पर्यतची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन बिलोलीचे उपविभागिय अधिकारी सचिन गिरी यांनी केले आहे. यावेळी नायब तहसीलदार आर. जी. चव्हाण, आर.एच.पंगे, दीपक मरळे, शेख अर्षद उपस्थित होते.