आसिफ खान शहर प्रतिनिधी ढाणकी
प्रत्येकच आई-वडिलांना वाटतं माझा मुलगा शिकून उच्चशिक्षित चांगल्या नोकरीला लागावा. यासाठी प्रत्येक आई-वडील मुलाच्या लहानपणापासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत, काबाड कष्ट करून मुलाला शिकविण्यासाठी सतत धडपडत असतात. ही प्रत्येकच आई-वडिलांची वस्तुस्थिती आहे. मग ते श्रीमंत असो अथवा गरीब असो. जो तो आपापल्या परीने मुलांना घडविण्यासाठी मेहनत घेतच असतो. परंतु पालकांची मुलांप्रतीची ही तळमळ योग्य मार्गाने मार्गक्रमण करीत असते का ? कुठे कुठे तर पालकांच्या अपेक्षांचं ओझं मुलांच्या खांद्यावर व पाठीवर लादल्या जातं. परिणामतः निष्कारण कोवळा जीव या ओझ्याखाली दबल्या जातो.सद्यस्थितीत मुलांना सहा तासाची शाळा, सकाळी दोन तास ट्युशन, सायंकाळी दोन तास ट्युशन असा दिनक्रम बऱ्याच विद्यार्थ्यांचा आपल्या निदर्शनास येईल.कुठे कुठे तर शाळेवर शिकवणारे शिक्षकच वर्गातील विद्यार्थ्यांना माझ्याकडे ट्युशन लावा असे म्हणतात, हे एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याचे अटीवर सांगितले. हे शिक्षक शाळेत वर्गात मुलांना शिकवण्या ऐवजी ट्युशनचा आग्रह का करत असावेत ? मग या विद्यार्थ्यांनी खेळायचं कधी ? बालपण हे खेळणे, बागडणे, शिकणे, पर्यावरणात हुंदडणे असे असायला हवे. परंतु या ट्युशनच्या नादात आणि पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्यापाई बालकांचं बालपण आपण हिरावून तर घेत नाही ना ? याचा प्रत्येक पालकांनी गांभीर्याने अभ्यास करावा.अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणा व्यतिरिक्त इतर सुप्त गुण सुद्धा असतात. उदाहरणार्थ चित्रकला, संगीत, खेळ त्या सुप्त गुणांना पालकांनी ओळखून वाव द्यायला हवा. प्रत्येकाची मुलं शिक्षणात पुढे असतात असे नाही, जर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण ओळखून त्यास वाव दिला तर त्या गुणाच्या माध्यमातूनही तो विद्यार्थी यशाचं शिखर गाठू शकतो. आणि इतिहास घडवू शकतो. हे कुठेतरी पालकांनी ओळखले पाहिजे. खेळामध्ये जागतिक स्तरावर देशाचे नेतृत्व करणारे अनेक खेळाडू आहेत. संगीतामध्ये जागतिक पटलावर भारतीय संगीत पोहोचवणारे अनेक कलाकार आहेत. चित्रकलेमध्ये सुद्धा जागतिक स्तरावर वाव आहे. हे कुठेतरी पालकांनी हेरलं पाहिजे. शिक्षण मानवी आयुष्यात अतिमहत्त्वाचे आहे यात दुमत नाही. परंतु या शिक्षणाबरोबर पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्या ऐवजी मुलाची शिक्षणा प्रतीची तळमळ आणि त्याच्यातील सुप्त गुणांना चालना देणे हे प्रत्येकांच कर्तव्य आहे .काही विद्यार्थी मित्रांकडून या गोष्टी सध्या कट्टया कट्टयावर ऐकायला मिळत आहेत.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)