बद्रीनारायण गलंडे
जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली : भा.ज.पा चे माजी नगरसेवक गणेश बांगर यांच्या शिवसेना शिंदे गट प्रवेशावरून भाजप आमदार तान्हाजी मुटकळे व शिंदे गट आमदार संतोष बांगर यांच्यात चांगलीच जुंपली असून, दोघांचे समर्थक समाज माध्यमांवर हल्ले – प्रतिहल्ले करीत आहेत. भाजपा पक्षाचे युवा कार्यकर्ते व दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडूण आलेल्या पैलवान गणेश बांगर यांनी मागील आठवड्यात भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी दिली. काही दिवस शांत राहून गणेश बांगर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी गणेश बांगर यांना पक्षात देऊन तसे एका दगडात अनेक पक्षी मारले. हिंगोली शहरातील वंजारवाडा भागात दोन प्रभागात चांगलेच वर्चस्व असलेल्या गणेश बांगर यांच्यामुळे शिवसेना शिदे गटाला हिंगोलीत मोठी ताकद मिळाली. या शिवाय गणेश बांगर यांच्या कार्यकर्त्याच्या मुळीचा आमदार संतोष बांगर यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल. दुसरीकडे गणेश बांगर यांच्या राजीनाम्यामुळे भाजपा पक्षात एक पोकळी निर्माण झाली. वंजारवाडा भागातून यापूर्वी भाजपा पक्षातर्फे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर वगळता इतर कोणीही निवडूण येऊ शकले नाही. या भागावर पूर्वीपासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. या वर्चस्वात दोन वेळा निवडूण आलेले गणेश बांगर आता शिंदे गट शिवसैनिक झाले आहेत. गणेश बांगर यांना आमदार सतोष बांगर यांनी शिवसेनेत घेतल्याने नाराज झालेल्या भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. यामुळे आमदार संतोष बांगर यांच्या नाराज झालेल्या कार्यकर्त्यानी समाज माध्यमांवर आ तान्हाजी मुटकुळे यांच्या विरोधात आघाडीच उघडली. अशातच एका प्रकरणात दोन दिवसापूर्वी एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे समर्थकही समाज माध्यमावर सक्रीय झाले आहेत या पूर्वीही या दोन नेत्यामध्ये बेबनाव झाला होता. सध्या दोघे सत्ताधारी महायुतीत असल्यामुळे एकत्र होते. अशातच हे नवीन वाद सुरु झाल्यामुळे हिंगोली जिल्हात राजकीय वातावरण प्रचंड प्रमाणात ढवळून निघत आहे.




