संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी :- तालुक्यातील जनतेचा मुख्य व्यवसाय हा शेती असून तालुक्यात कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणात आहे तेव्हा तालुक्यातील शेतकरी खरिप हंगामात मुख्य व नगदी पीक म्हणून कपाशी पाठोपाठ सोयाबीन या पिकाची लागवड करतात.यावर्षी खरिपात चक्क सात हजार दोनशे बावीस हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन या पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे परंतु यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे व आलेल्या किडीमुळे सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातून निसटले तर कापूस पिक एका वेचणीत उलंगवाडीच्या स्थितीत असल्याने खरिपातील उत्पादन घटले आहे . तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी संरक्षणासाठी खरिपातील पिकांचा पिकविमा उतरविला आहे.सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी एक रूपयात पिकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले तेव्हा उर्वरित रक्कम विमा कंपनीला शासनाच्या तिजोरीवर भार पडला आहे.तेव्हा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी पिकविमा उतरविला असतांनाही आजपर्यंत शेतकरी पिकविम्याच्या लाभासाठी वंचित असल्याने आज दुपारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी धडक दिली व पिकविमा कंपनीच्या तालुका संयोजकाला कृषी अधिकारी कार्यालयात बोलावण्याची अट घातली तेव्हा कंपनीचे संयोजक कार्यालयात येताच उपस्थित शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.तेव्हा उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली. पिकविमा कंपनीच्या तालुका संयोजकाने नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी मागीतला आहे.सात हजार शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व्हेक्षण येत्या एका आठवड्यात पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली आहे.तेव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनही पिकविम्याचा लाभ मिळाला नसल्याचे वास्तव उजागर असतांनाही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधीं मात्र चुप्पी साधून बसले आहेत. सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकरयांना मदतीचा हात देण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच शेतकऱ्यांच्या खरिपातील पिकांचे नुकसान झाले आहे तेव्हा पिकविम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांचा प्रश्न शासनदरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे.यावेळी कृषी अधिकारी कार्यालयात माजी जि पण सदस्य आशीष लोणकर, माजी सभापती कृउबास अभिषेक ठाकरे, माजी सभापती पंचायत समिती घाटंजी रूपेश कल्यमवार, संचालक आशीष भोयर,तालुका कृषी अधिकारी सुरेशसिंग राठोड,अरविंद चौधरी सह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या समोर उत्पादन घटल्याने सुलतानी संकट उभे ठाकले आहे तेव्हा यावर्षी शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांचे संरक्षण दृष्टीने पिकविमा उतरविला आहे परंतु शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही व दुष्काळाच्या यादीतून चक्क घाटंजी तालुका वगळल्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून प्रयत्न होत नसल्याची खंतही शेतकरी व्यक्त केली जात आहे.