शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
विभागीय आयुक्तांना निवेदन
जिंतूर : दि.10संपुर्ण मराठवाडा विभागात दुष्काळ जाहीर करावा, मागील वर्षाचे अतिवृष्टीचे अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांच्यासह माजी आमदार विजय भांबळे यांनी गुरुवारी (दि.9) विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.यावर्षी आपल्या मराठवाड्यात पावसाळा कमी प्रमाणात झालेला असल्याने जवळपास संपुर्ण मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती झालेली आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, पाणी, तसेच शेतीसाठी पाणी याची फार मोठी समस्या मराठवाड्यात निर्माण झालेली आहे. अशी वस्तुस्थिती असताना देखील शासनाने मराठवाड्यातील फक्त काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेले आहे. संपुर्ण मराठवाड्यातील खरीप पिके पाण्या अभावी येऊ शकली नाही. तसेच नद्या, धरणे, बंधारे यात पाणीसाठा नाही. त्यामुळे संपुर्ण मराठवाडा विभाग हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा.तसेच मागील वर्षी मराठवाड्यात अतिवृष्टी झालेली होती. त्याबाबत शासनाने शेतकर्यांना हेक्टरी रुपये 13 हजार 600 रुपये अनुदान 3 हेक्टर पर्यंत जाहीर केले होते. परंतु अद्याप पर्यंतही संपुर्ण शेतकर्यांना हे अनुदान प्राप्त झालेले नाही. तरी अनुदाना पासून वंचित राहिलेल्या शेतकर्यांना अतिवृष्टीचे अनुदान त्वरीत देण्यात यावे. तसेच पिक विम्याची 100 टक्के अग्रीम रक्कम त्वरीत देण्यात यावी तसेच मागील वर्षीचा पीक विमा त्वरीत वाटप करण्यात यावा इत्यादी मागण्या करण्यात आल्या.