गजानन डाबेराव
ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :अप गाडी क्र. १२८३४ हावडा अहमदाबाद एक्सप्रेस वर पॅन्ट्री कारमध्ये चढल्यावरून झालेल्या वादातून १० ते १२ जणांच्या टोळक्याने पैन्ट्री कोचवर तुफान दगडफेक केल्याची घटना २५ ऑक्टोबरच्या रात्री एक वाजता नांदुरा रेल्वे स्थानकावर घडली. याबाबत वृत्त असे की, पॅन्ट्रीकार मॅनेजर सोनू परमार वय ३८ रा धनीना आग्रा यांनी भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, हावडा अहमदाबाद एक्सप्रेस वर अकोल्यावरून १० ते १२ जण पॅन्ट्री कारमध्ये चढले असता त्यांना ‘तुम्ही दुसऱ्या कोचमध्ये जा’, असे म्हटले असता आमची शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी त्यांनी नांदुरा आल्यावर तुला दाखवतो असे बोलून रात्री एकच्या सुमारास गाडी नांदुरा स्टेशनवर आल्यानंतर सदर इसमांनी पॅन्ट्री कारच्या कोचवर तुफान दगडफेक केली.सदर तक्रारीवरून भुसावळ रेल्वे पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या दहा ते बारा जणांविरुद्ध भांदवीच्या कलम १४१, १४३, १४७, ४२७ तसेच भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १५१ अन्वये गुन्हे दाखल केले असून सदर गुन्हा शेगाव लोहमार्ग पोलीस ठाणे येथे वर्ग
करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मगर हे करीत आहे.