शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
परभणी : वाचन प्रेरणा दिना निमित्त वक्त्यांचा सुर; अक्षर भेट उपक्रम पुस्तक माणसांना सुसंस्कृत, समृद्ध करतात. पुस्तकांमुळे माणसांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. पुस्तके माणसांची जगाकडे, माणसांकडे बघण्याची दृष्टी व्यापक करतात. असा सुर वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उमटला. मराठवाडा साहित्य परिषद परभणी व शारदा महाविद्यालयाच्या मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम रविवार १५ ऑक्टोबर रोजी शारदा महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कथाकार डॉ. आसाराम लोमटे, मराठवाडा साहित्य परिषद, परभणी शाखेच्या अध्यक्ष सरोज देशपांडे, प्रसिद्ध लेखक बाबा कोटंबे, आदर्श शिक्षक माणिक पुरी, शरद ठाकर, मारूती डोईफोडे यांची उपस्थिती होती. या वेळी वक्त्यांनी ‘ माझे वाचन’ या विषयावर आपल्या भावना व्यक्त केल्या. शुन्यातून विश्व निर्माण करण्याचे सामर्थ्य आणि कौशल्य हे पुस्तकांच्या वाचनातून मिळते. आजच्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यां मध्ये वाचन संस्कार रूजविला पाहिजे. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मराठवाडा साहित्य परिषद, परभणी शाखेचे कार्यवाह प्रा. भगवान काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सचिन खडके, ग्रंथापाल डॉ. प्रशांत मेणे, त्र्यंबक वडसकर, प्रा. हनुमान व्हरगुळे, सुरेश जयपूरकर, प्रा. अविनाश पांचाळ, अरविंद सगर, गंगाधर गायकवाड यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास डॉ. भिमराव खाडे, केशव खटींग, प्रा. सावित्रा चिताडे, साहित्यिक, शिक्षक आदींची उपस्थिती होती.
आदर्श शिक्षकांचा सत्कार…
जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माणिक पुरी, शरद ठाकर, मारुती डोईफोडे यांचा मसाप व शारदा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी या तीनही पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी ‘ माझे वाचन ‘ या विषयावर मनोगत व्यक्त केले. तर आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या उपक्रमाबद्दल सांगितले.