अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
सेवा प्रदाता सर्ग विकास समिती अकोला व डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून मेडशी मध्ये दोन गटाच्या माध्यमातून जवळपास चाळीस पेक्षा जास्त शेतकरी आहेत.सर्व शेतकरी बांधवानी मिळून दोनशे एकर शेती मिशनच्या प्रकल्प सेंद्रिय शेती कडे वळवली आहे.रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात.त्यातून तयार होणारी धान्ये,भाज्या, डाळी यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, डाळी आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणार्या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते. शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि कसलीही जंतूनाशके न मारता निव्वळ सेंद्रीय शेती केली असेल तर त्या शेतातलाच माल कटाक्षाने विकत घेतला जातो आणि खतांचा आणि औषधांचा वापर केलाच असेल तर त्या खतांचे आणि औषधांचे काही अंश डाळीमद्ये आणि भाज्यांमध्ये उतरलेले तर नाहीत ना,याची खातरजमा केली जाते.तसे ते उतरले नसतील तरच तो माल घेतला जातो.अन्यथा तो परत पाठवला जातो.या बाबत ही दक्षता घेण्याचे कारण असे की, खताचे अंंश उतरलेले खाद्य पदार्थ खाल्ले तर ते खताचे रासायनिक अंश आणि औषधातील विषारी अंश आपल्या खाण्यातून रक्तात पोचत असतात.त्यामुळे मानवी शरीरात खुप साऱ्या दुर्धर आजार बळावतात.ह्याची दाखल घेत मेडशी मधील प्रगतशील शेतकरी अजिंक्य मेडशीकर यांनी मिशन अंतर्गत मेडशी मध्ये दोन गटाची स्थापना केली. संत भगवान बाबा जैविक शेतकरी शेती गट व समृद्ध शेतकरी जैविक शेती गट ह्या गटांच्या माध्यमातून गांडूळ खत निर्मिती,बायोडेनामिक कंपोस्ट खत,तरल खत, निंबोळी अर्क हे स्वतःच शेतकरी तयार करून स्वतःच्या शेती मध्ये वापरतात. तर शिवाजी भारती तज्ञ प्रशिक्षक व क्लस्टर मॅनेजर शंकर शिंदे यांनी शेतकरी वर्गाला जैविक मिशनची संकल्पना,उद्देश व बायोडायनॅमिक शेती तंत्रज्ञान, पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया, शेतकरी उत्पादक कंपनीचा उद्देश व त्या मधून शेतकर्याला होणारे फायदे या विषयी परिपूर्ण आणि मोलाचे मार्गदर्शन करतात.या गटामध्ये विनायकराव मेडशीकर, प्रा उल्हास मेडशीकर,उल्हास घुगे, चंद्रकांत घुगे,दत्तराव घुगे,मनीष घुगे,निशांत घुगे, सतीश घुगे,प्रकाश सानप,योगेश घुगे,डिगांबर घुगे,हर्षालता घुगे,मीनाक्षी मेडशीकर,सुदाम मेडशीकर,ताराबाई मेडशीकर यांच्यासह अजून खूप सारे सदस्य आहे जे दिवस रात्र मेहनत करून गटाच्या माध्यमातून जैविक शेती करत आहेत.