पुणे : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती अर्थात एनएमएमएस शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची संधी देण्यात आल्याचे योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे. शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेसाठी शैक्षणिक प्रकल्प वर्ष 2023-24 साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर नवीन व नूतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी पोर्टल सुरू करण्याचे केंद्र शासनाने निर्देशित केलेले आहे. त्यानुसार, संबंधित जिल्ह्यांनी नवीन व नूतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीची कामे 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायची आहेत. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील पडताळणीसाठी 15 डिसेंबर, तर दुसर्या टप्प्यातील पडताळणीसाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. या वर्षी मुदतवाढ मिळणार नाही. नोंदणी करताना 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही आधारकार्ड काढलेले नाही, त्या विद्यार्थ्यांनी आधारकार्डसाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. ई -केवायसी होईपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी तात्पुरती असेल.


