डॉ. शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी
परभणी.
सेलू : दि.१८ ऑगस्ट. आधीच कमी पाऊस त्यात अर्धा अधिक खरीप हंगाम संपत आला असून अशात मराठवाड्यात विविध पंचवीस बोगस कंपन्या खते व औषधी विक्री करत आहेत त्यावर तात्काळ बंदी करण्यात यावी. तालुक्यासह जिल्ह्यातील बोगस बियाणांसह खतांच्या विक्री विरोधात कृषि व महसूल विभागाने युध्द पातळीवर मोठी मोहिम राबवावी, अशी मागणी सेलू दबाव गटाच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी केली. पेरण्या पूर्ण झाल्या- -नंतर कृषी विभागाने बोगस बि-बियाणे व खतांच्या कंपन्यांची यादी प्रसिध्द केली. ही यादी प्रसिद्ध केल्याने वरातीमागून घोडे असा प्रकार उघडकीस आला. शेतकर्यांनी खते खरेदी केल्यानंतर बोगस खतांची यादी जाहीर करण्याचा हा प्रकार शेतकर्यांना लुटणाराच ठरला, असे मत दबाव गटाने व्यक्त केले.जिल्ह्यात शेतकर्यांची फसवणूक झालेली आहे, तसेच मोठ्या प्रमाणातील खतांच्या दरामुळे आर्थिक नुकसान झालेले आहे. यास सर्वस्वी जिल्हा परिषद व कृषी विभागातील अधिकारीच जबाबदार आहेत. त्यांनी संबंधीत कंपनी व दुकांदारांशी संगनमत करून शेतकर्याची फसवणुक केली आहे. कमीत कमी यापुढे तरी या यादीतील खत विक्रीवर बंदी आणण्यात यावी. संबंधीत दुकानदारां कडील बोगस खतांचा साठा तात्काळ जप्त करण्यात यावा.ज्या दुकानदारांनी बोगस कंपन्याची खते, बियाणे शेतकर्यांना कृषी अधिकार्यांशी संगनमताने विक्री केली त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणीही निवेदनात केली आहे.खतांचे प्रक्रिया मुल्य व विक्री मुल्य यामध्ये प्रचंड तफावत आहे.खतांच्या किमतींवर शासनाचे व प्रशासनाचे यांचे नियंत्रण आवश्यक आहे. या मनमानी किंमत आकारणी मुळे शेतकरी बांधव राजरोसपणे लुटला जात आहे आणि विक्रेते व कंपनी प्रचंड नफा कमावत आहे. त्यावर तात्काळ नियंत्रण आणणे आवश्यक आहे. आपण या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून ताकाळ दोषींवर कारवाई सुरू करावी. बोगस खतांचा साठा जप्त करावा. जिल्हा परिषद अंतर्गत सर्व तालुका व जिल्हा कृषी अधिकारी यांची या अत्यंत निंदनीय व बेजबाबदार वर्तना बद्दल विभागीय चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
याप्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास दि.17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी जिल्हा परिषद कृषी विभागा समोर लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनावर दबाव गटाचे निमंत्रक अॅड. श्रीकांत वाईकर, गुलाब पौळ, ओमप्रकाश चव्हाळ, लिंबाजी कलाल, मुकुंद टेकाळे, रामचंद्र कांबळे, दत्तराव कांगणे, रामचंद्र आघाव, चिंतामण दौड, लक्ष्मण प्रधान, इसाक पटेल, नारायण पवार, उध्दव सोळंके, सोनू शेवाळे, दिलीप शेवाळे, उत्तम गवारे, विलास रोडगे, मतीन दादामियाँ, परमेश्वर काटे, दिलीप मगर, रौफ भाई, अशोक कलाल, जलालभाई, उमेश काष्टे, योगेश सुर्यवंशी, अॅड. सुरेश खापरखुंटीकर, मोहन खापरखुंटीकर, केशव दिग्रसकर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.











