.डॉ.शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधीपरभणी. परभणी,दि.19 : जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 8.5 मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून शनिवारी सकाळपासूनच संततधार पाऊस सुरुच होता. सायंकाळी 5 वाजेपर्यंत पावसाची रिमझिम सुरुच राहीली. सर्वाधिक पाऊस परभणी आणि पूर्णा तालुक्यात 12.1 मिली मीटर एवढा पडला. तालुकानिहाय पावसाचे प्रमाण कमी जास्त असले तरी गेल्या 24 तासात जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून पावसाने ताण दिला होता. पिके सुकू लागली होती. शेतकर्यांना चिंता लागली होती. साधारणपणे पावसाला 1 आठवडा उशीर झाल्यामुळे खरीपाचे पीक हातचे जाते की काय, अशा प्रकारची चिंता शेतकर्यांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु, शुक्रवार पासून पावसाचे जिल्ह्यात पुनरागमन झाले असून यामूळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. तालुका निहाय पडलेल्या पावसाचा विचार केला असता परभणी आणि पूर्णा या तालुक्यात 12.1 मिली मीटर पाऊस झाला असून सेलू 9.7 मि.मी., पाथरी 8.8 मि.मी., पालम 8.3, मि.मी., जिंतूर 7 मि.मी., गंगाखेड 5.2 मि.मी., सोनपेठ 4.6 मि.मी. तर सर्वात कमी मानवत तालुक्यात 4.5 मिली मीटर पाऊस दुपारी 12 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात झाला असल्याची नोंद कृषि विभागाने दिली आहे. प्रादेशिक हवामानाच्या अंदाजा नुसार येत्या 24 तासात जिल्ह्यात तूरळक ठिकाणी वादळी वारा व मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विजांचा कडकडाटही होणार असून वार्याचा वेग ताशी 30 ते 40 कि.मी. राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या शिवाय काही ठिकाणी जोरदार पावसाचीही शक्यता वर्तविली आहे.











