महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती, दि. १६ : तालुक्यातील वायगाव (तु.) येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण मागील सत्रात इ. सातवीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी आरती बालाजी घोडमारे हिच्या हस्ते करण्यात आले. सदर ध्वजारोहण करण्याचा मान शाळेच्या मुख्याध्यापकांना होता. परंतु शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याकरिता मुख्याध्यापक गजानन घुमे यांनी ही बाब शा. व्य. स. च्या सभेत मांडली, त्यावर सर्वांनी एकमताने मंजुरी देऊन हा नवीन बदल घडवून आणला. या उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.तसेच या शाळेतील दोन शिक्षक पदे रिक्त असल्याने मागील दोन महिन्यांपासून नियमित अध्यापन करण्याकरिता विनामूल्य सेवा देत असलेल्या आशिष गेडाम या तरुणाचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची भाषणे, समूहनृत्य, पथनाट्य सादर करण्यात आले.याप्रसंगी मंचावर सरपंच भावनाताई कुरेकार, उपसरपंच विनोद मडावी, सदस्य कैलास भैसारे, शा. व्य. स. च्या अध्यक्ष निलीमा कुरेकार, उपाध्यक्ष विनोद पोईनकर, सदस्य प्रशांत मडावी, विठ्ठल बावणे, पौर्णिमा टेंभुर्णे, मीना टेंभुर्णे, भाग्यश्री डाखोरे, जगन्नाथ बाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकिशोर धानोरकर, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव योगेश्वर कुरेकार, ग्रामविकास अधिकारी नाईकवार, से. नि. शिक्षक मडावी गुरुजी, बारेकर गुरुजी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गजानन घुमे यांनी केले, तर सूत्रसंचालन राहुल बिपटे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिक्षक विलास बतकी, राहुल बिपटे, महेश सोरते, ज्ञानेश्वर जांभुळे, कविता हनवते, आशिष गेडाम, कर्मचारी वर्ग शालीक पोईनकर, जगदीश पोईनकर, सुरेश बावणे, शत्रुघ्न गराटे यांनी परिश्रम घेतले.