माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी बातमी का लावली म्हणून शिवीगाळ करत धमकी दिली. समाज माध्यमांवर तशी त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. सदर ऑडिओ क्लिप आपलीच असल्याचे आमदार पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी दिलेल्या मुलाखतीत मान्य केले आहे. त्यानंतर महाजन यांना भर चौकात काही गुंडांनी मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सदर मारहाण ही आमदार किशोर पाटील यांच्या सांगण्यावरून झाली असल्याचा आरोप पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे. या घटनेमुळे राज्यातील पत्रकारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
सदर मारहाणीचा जिंतूर येथे व्हॉइस ऑफ मीडिया, तालुका प्रेस क्लब व विविध पत्रकार संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला. या घटनेची गंभीर दखल घेऊन दोशींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिंतूर तहसीलदारांमार्फत एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर विजय चोरडिया, भागवत चव्हाण, मंचकराव देशमुख, गुलाबराव शिंदे, राम रेघाटे, महेश देशमुख, दिलीप देवकर, राजाभाऊ नगरकर, राहुल वावळे, दिलीप माघाडे, रामप्रसाद दराडे, माबुद खान आदींच्या सह्या आहेत.