सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड हिंगोली लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे खा.हेमंत पाटील यांनी मागील निवडणुकीत मोठे मताधिक्य घेत काँग्रेसचे सुभाषराव वानखेडे यांचा पराभव केला होता. मात्र हेमंत पाटलांबाबत मतदार संघात आता नाराजीचा सुर असल्यामुळे हा मतदार संघ सेनेकडू भाजपा कडे जाण्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य,तथा हिंगोली लोकसभा प्रभारी दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी भक्कम तयारी चालविली असून मागील दोन दिवसां पासून ते महागावातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल मध्ये भेटी देऊन पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवित आहेत. सुमठाणकरांच्या झंझावाती दौर्यामुळे भाजपा हिंगोली मतदार संघावर दावा सांगणार अशी चर्चा सुरु झाली आहे. रामदास पाटील सुमठाणकर लोकसभा प्रवास योजनेच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्र्याचा आगामी होणारा प्रवास, केंद्र योजनेचे लाभार्थी, वार रूम आणि बूथ सशक्तिकरण अभियान,सरल ऍप या बाबत तांडे,वाड्या, वस्त्या व गावोगावी जाऊन माहिती देत आहेत. १३ ते १६ मे या कालावधीत त्यांनी उमरखेड विधान सभा मतदार संघाचा दौरा करून उमरखेड आणि महागाव तालुक्यातील सर्व जि.प. सर्कल मध्ये जनतेची प्रत्यक्ष संवाद साधून योजनांची माहिती दिली. महागाव शहरातील भाजपा बूथ प्रमुखांशी संवाद साधत त्यांनी बारकाईने कामाचा आढावा घेतला. हिवरा आणि पोखरी सर्कल च्या भेटी आटोपून त्यांनी येथील विश्राम गृहात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची धोरणे आणि त्यांच्या जनसंपर्क दौर्याची माहिती दिली. रामदास पाटील सुमठाणकर हे २००९ च्या एमपीएससी बॅच चे राजपत्रित अधिकारी आहेत. नगर पालिकांचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी हिंगोली पासून किनवट पर्यंत सेवा दिली व विकास कामांची ब्ल्यू प्रिंट तयार करीत त्याला मुर्त रूप दिले. स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. मागील चार वर्षापासून ते हिंगोली मतदार संघात पक्षाची जोरदार बांधणी करीत आहेत. त्यांच्या कामाचा आवाका पाहता हा मतदार संघ शिवसेनेकडून भाजपा हस्तगत करणार असे चिन्ह आहे. सुमठाणकर येथे भाजपचे संभाव्य उमेदवार राहतील अशीही चर्चा आहे.











