शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
सृजनशील लोकमताच्या अभावामुळे लोकशाही राबविण्यात अडचणी येतात. सरकार व कायदेमंडळाचे कामकाज योग्य रीतीने होण्यासाठी लोकमत ओळखता आले .हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शिक्षण व प्रचार यांतील फरक सांगणे जरूर आहे. प्रचाराधिष्ठित सरकार व लोक शिक्षणाचा पाया करणारे सरकार यात महदंतर आहे. प्रचार म्हणजे कोणत्याही गोष्टींची एक बाजू होय. लोक शिक्षणावर आधारलेले सरकार म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजूची सांगोपांग छाननी करून कारभार करणारे सरकार होय. ज्या प्रश्नावर कायदेमंडळांना निर्णय घ्यायचा असतो, त्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू लोकांपुढे जाणे जरूर आहे. त्यासाठी ओघानेच दोन पक्षाची आवश्यकता असते. एकच पक्ष दोन्ही बाजू निसर्गतःच मांडू शकत नाही. एकपक्षीय कारभार म्हणजे निव्वळ हुकूमशाही होय. हुकूमशाही टाळण्यासाठी दुसऱ्या पक्षाची जरूर आहे. ही मूलभूत बाब आहे. चांगल्या कायद्यांपेक्षा चांगल्या राज्यकारभारांशी लोकांना कर्तव्य असते. कायदे चांगलअसतीलही, पण त्यांची अंमलबजावणी वाईट तऱ्हेने होऊ शकते .राज्यकारभार चांगला किंवा वाईट आहे हे अंमलबजावणीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला कितपत स्वातंत्र्य आहे यावर अवलंबून आहे. ज्यावेळी एकच पक्ष असतो त्यावेळी कोणताही अधिकारी मंत्री या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या राजकीय नेत्याच्या मर्जीप्रमाणे वागणारा प्राणी बनतो. मंत्र्यांचे अस्तित्व मतदारावर अवलंबून असते, व मग मतदारांना खूष ठेवण्यासाठी पुष्कळ वेळा मंत्रीमहाशयाकडून विचित्र (चुकीचा) असा कारभार अधिकाऱ्यांकडून करवून घेतला जातो. विरोधी पक्ष असला तर मंत्र्याची ही चुकीची कृत्ये तो उघडकीस आणू शकेल आणि त्यामुळे अशा गोष्टींना पायबंद बसेल .चांगल्या कारभाराखालील लोकांना भाषण स्वातंत्र्य व विनाचौकशी तुरूंगवासापासून मुक्तता या गोष्टीची आवश्यकता वाटते. विरोधी पक्ष असतो त्यावेळी भाषणस्वातंत्र्य व आचारस्वातंत्र्य यांचा लाभ होतो. विरोधी पक्ष नसल्यावर लोकांचे हे मूलभूत हक्क धोक्यात येतात. कारण मग ह्या लोकांची पायमल्ली करणाऱ्या सत्तारूढ पक्षाला कोणीच जाब विचारू शकत नाही .विरोधी पक्षाची गरज का आहे याची ही थोडक्यात कारणे आहेत. जेथे जेथे संसदीय लोकशाही राज्यपद्धती (Parliamentary Government) आहे, त्या त्या देशात विरोधीपक्ष (Recognisal Political Institution) ही सरकारमान्य राजकीय संस्था असते.इंग्लंड व कॅनडामध्ये विरोधीपक्ष ही कायद्याने मान्य केलेली संस्थाआहे आणि पार्लमेंट ( कायदेमंडळ ) मधील कामे बिनधोक पार पाडता यावीत म्हणून विरोधी पक्ष नेत्याला सरकारी तिजोरीतून पगार दिला जातो.
विश्वभूषण. डॉ बाबासाहेब आंबेडकर