प्रकाश नाईक
तालुका प्रतिनिधी, अक्कलकुवा
अक्कलकुवा : दि. १६ जुलै २०२३ राेजी अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी येथे कायदेविषयक साक्षरता अभियानांतर्गत शिबीर घेण्यात आले. आजचे तरुण उद्या देशाचे जबाबदार आणि जागरूक नागरिक होणार आहे, म्हणून शाळा महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागृती निर्माण होणे गरजेचे आहे. यांच्याच माध्यमातून तळागाळातील समाजाला न्यायाच्या प्रक्रियेत आणणे देखील तितकेच आवश्यक असल्याचे मत अक्कलकुवा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.पी.शिंदे यांनी व्यक्त केले. जिल्हा विधिसेवा प्राधिकरण व अक्कलकुवा तालुका विधी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भांगरापाणी आश्रमशाळेत कायदेविषयक साक्षरता शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कुलदैवत याहा मोगी माता प्रतिमा पूजनाने करण्यात आले. ॲड.रुपसिंग वसावे यांनी प्रस्ताविकेतून महाविद्यालयीन जीवनात युवक-युवतींच्या संकल्पना व विचार वेगळे असतात. विद्यार्थी दशेत असताना अन्याय, अत्याचार व संकटाला वाचा फोडणे गरजेचे आहे. यासाठी कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यामुळेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत महाविद्यालयीन युवतींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले. दरम्यान अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश व्ही.पी.शिंदे यांनी सांगितले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागृती निर्माण होणे गरजेचे आहे. आजचे तरुण उद्या देशाचे जबाबदार आणि जागरूक नागरिक होणार आहेत. शाळा महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांच्यामध्ये कायदे विषयक जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे, जिल्हा विधी सेवा व तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नामुळे जीवनातील महत्त्वाचे कायदेविषयक ज्ञान कॉलेजमधील विद्यार्थिनींना मिळाले आहे. या जनजागृतीमुळे विद्यार्थिनी कायद्याविषयी जागृत झाल्या असून उद्याचे आदर्श नागरिक होण्यासाठी या ज्ञानाचा त्यांना फायदा होईल, असे सांगितले. शिवाय कोर्टात येणाऱ्या गरजू आणि गरीब लोकांना मोफत वकील सुविधा प्राधिकरणाकडून पुरविण्यात येते. अनेकदा कोर्टात हजर करण्यात आलेल्या आरोपींची बाजू मांडण्यासाठी त्यांना वकील नेमता येत नाही. तर वकील नेमण्यासाठी नातेवाइक किंवा ओळखीची कोणी व्यक्ती नसल्यामुळे त्यांना वकील नेमता येत नाही. अशा वेळी कोर्टाकडून विधी सेवा प्राधिकरणातर्फे कामकाज पाहण्यासाठी वकील नेमला जातो. मोफत वकील सुविधा प्राधिकरणातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पक्षकार, महिलांना देण्यात येते. त्यासाठी संबंधितांना प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागतो. दाखल करण्यात आलेल्या अर्जाची तपासणी करून प्राधिकरणातर्फे वकील नेमला जातो, असेही न्या.शिंदे यांनी सांगितले. ॲड.पी.आर.ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. कायद्याचे ज्ञान नाही म्हणून शिक्षेपासून तुमची सुटका होऊ शकत नाही. आपण आपल्या अधिकारासोबतच आपल्या कर्तव्याबाबतही जागरुक असले पाहिजे. असे सांगून रॅगिंग विरोधी कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. ॲड.संग्राम पाडवी यांनी समाजातील सामान्य व्यक्ती आजही कायदेविषयक माहितीपासून अनभिज्ञ आहेत. किरकोळ वादविवाद घेऊन ते पोलीस ठाण्यात येतात. त्यामुळे पोलिसांचेही काम वाढते. शेवटी कोर्टात जातात. सर्वसामान्य लोकांना कोर्टात येणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे सर्वांना स्थानिक पातळीवर कायदेविषयक माहिती असावी, सर्वसामान्यांना न्याय स्थानिक पातळीवर मिळावा.
ॲड.जितेंद्र वसावे यांनी राज्य घटनेची माहिती दिली. ॲड.फुलसिंग वळवी, यांनी पैसा कायदा माहिती दिली व ॲड.गजमल वसावे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात माहिती दिली. व सरकरी अभियोक्ता ईश्वर वळवी यांनी फौजदारी कायदे विषयक मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड.राजेंद्र इंदिस, ॲड.आर.आर.मराठे, ॲड.एस.आर.राणे, ॲड.जे.टी.तडवी, ॲड.आर.टी वसावे, ॲड.डी.एफ.पाडवी, ॲड.आर.पी.तडवी, ॲड.शोभा वसावे, ॲड.सरदार वसावे, ॲड.एच.एन.पाडवी, ॲड.सुरेश वसावे, जिल्हा परिषद सदस्य सी.के.पाडवी, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, भांगरापाणी ग्रामपंचायत सरपंच सोन्या वसावे, उपसरपंच रामसिंग वसावे, काठीचे सरपंच सागर पाडवी, न्यायालयीन कार्यक्रम कर्मचारी वरिष्ठ लिपिक कैलास शिवदे, धिरसिंग वळवी, गुलाबसिंग पावरा, लघुलेखक मयुर पाटील, पोलीस पाटील विनोद वसावे, मुख्याध्यापक डी.व्ही पाडवी, व्यवस्थापक एम.एन. तडवी, एस.टी.अहिरे, एक.व्ही.वसावे, श्रीमती आर.बी.तडवी, आर.पी.वसावे, जामलीचे पोलीस पाटील गेना कालुसिंग तडवी, मालतीबाई सोन्या वसावे, तुषार सोन्या वसावे, रोजगार सेवक कालुसिंग मंगल्या तडवी, ग्रा.प.सदस्य कविराज तडवी यांच्यासह आश्रम शाळेतील शिक्षक वृद्ध व विद्यार्थी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.