गोपाळकुमार कळसकर
तालुका प्रतिनिधी भुसावळ
भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कामकाज संदर्भात यावल व रावेर येथे प्रत्यक्ष भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाची पूर्वतयारी बाबत माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी यावल नगरपरिषद कार्यालय भेट दिली. यावेळी तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवडणूक मतदान केंद्रावर मतदारांसाठी दिल्या जाणाऱ्या सोई सुविधा मतदान जागृती इत्यादी विषयांबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यानंतर रावेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रशिक्षण कार्यशाळेतील उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज,मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. मतदानाच्या दिवशी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात त्यांनी प्रशिक्षणास उपस्थितांना सूचना दिल्यात. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल या बाबत दक्ष रहावे असे त्यांनी सांगितले. निवडणूक मतदान प्रक्रियेचे सर्व कामकाज समजून घ्यावे तसेच मतदारांना मतदानाच्या दिवशी काही अडचण आल्यास मदत करावी, मतदान प्रक्रिया संदर्भात मतदारांना माहिती होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने जनजागृती करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यात. या प्रसंगी रावेरचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रावेर बंडु कापसे उपस्थित होते.











