रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
महागाव:
महागाव तालुक्यातील वागद (इ) येथे काळी (दौ) पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीने आयोजित पशुसंवर्धन जागरूकता अभियानाला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या पुढाकाराने आणि उपस्थितीत हे महत्त्वपूर्ण कृती शिबिर पार पडले. सध्या ग्रामीण भागात जनावरांमध्ये तोंडखुरी आणि पायखुरी या गंभीर संसर्गजन्य रोगांची साथ वेगाने पसरत आहे. खाजगी डॉक्टरांकडील औषधोपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने पशुपालक हवालदिल झाले होते. या शिबिरामुळे त्यांना मोठा आधार मिळाला आहे.
बदलत्या हवामानाचा फटका आणि थंडीच्या लाटेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या शिबिरात केवळ औषधोपचारच नव्हे, तर वंध्यत्व तपासणी आणि खच्चीकरण यांसारख्या महत्त्वाच्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. तज्ज्ञांनी जनावरांच्या आहारात आणि निवाऱ्यात काय बदल करावेत याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे महागड्या उपचारांचा भुर्दंड वाचल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले.
या यशस्वी उपक्रमासाठी काळी (दौ) येथील संस्थाप्रमुख रुपेश चंद्रकांत नरवाडे, पोखरी येथील संस्थाप्रमुख गजानन राठोड, तसेच सहकारी करण चव्हाण, अनस मिर्झा बेग आणि गोपाल राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराचा लाभ घेण्यासाठी पशुपालक कैलास नारायण राठोड, तुकाराम नानू राठोड, गोविंद गणपतराव जाधव कारभारी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महागड्या औषधोपचारांचा खर्च वाचल्याने पशुपालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.











