सुरेश वाघमारे
ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
नायगाव : तहसीलदार सौ. धम्मप्रिया गायकवाड यांच्या खुर्चीवर आमदाराने पुष्पमाळ चढवल्याच्या कथित अपमानप्रकरणाने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते राहुल दत्ता जिंगळेकर यांनी नोंदविलेल्या तक्रारीवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने थेट हस्तक्षेप केल्यानंतर आता प्रशासकिय यंत्रणा पूर्णपणे धावू लागली आहे. महिला आयोगाकडून विभागीय आयुक्तांना आलेल्या पत्रानंतर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने आज तातडीची आणि कडक कारवाई करत उपविभागीय अधिकारी बिलोली यांना फक्त तीन दिवसांच्या अल्प मुदतीत चौकशी अहवाल देण्याचे स्पष्ट आदेश बजावले आहेत. हा आदेश झाकायला नव्हे तर जबाबदारी निश्चित करण्यासाठी दिला असल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे. नायगावचे आमदार राजेश पवार यांनी तहसीलदार सौ. गायकवाड या त्यांच्या सासऱ्यांच्या अंत्यसंस्कारामुळे सुट्टीवर असताना त्यांच्या अधिकारिक खुर्चीवर थेट पुष्पहार ठेवून अधिकारालाच चपराक दिली असून ही कृती केवळ व्यक्तिगत अपमान नसून प्रशासकीय सन्मानाचा उघड उघड अवमान आहे, असा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते राहुल जिगळेकर यांनी आपल्या निवेदनात महिला आयोगाकडे स्पष्टपणे मांडण्यात आला होता. सदर तक्रारीची प्रत मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी कोणतीही ढिलाई न करता आदेश जारी असून यात उपविभागीय अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले की, संपूर्ण प्रकरणाची सखोल, निर्भीड व निष्पक्ष चौकशी करावी. प्रत्येक मुद्द्यावर स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदवून तीन दिवसांत प्रत्यक्ष अहवाल सादर करावा. हा आदेश इतका कडक आहे की, चौकशी ढिलाईने होऊ नये म्हणून प्रशासनाने मुदतही अल्प ठेवली आहे. या प्रकरणाने नायगाव व नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले असून जनतेत, प्रशासनात आणि सोशल मीडियावर याबाबत प्रचंड चर्चा रंगली आहे. एका आमदाराकडून तहसीलदार पदाच्या सन्मानाचा असा कथित अवमान झाल्याचा मुद्दा लोकांच्या भावनांना चटका लावणारा ठरत आहे.आगामी चौकशी अहवालाच्या निष्कर्षावर अनेकांचे राजकीय भविष्य परिणाम होऊ शकते, अशीही कुजबुज सुरू आहे. येणारे तीन दिवस निर्णायक असून चौकशी अहवाल महिला आयोग आणि विभागीय आयुक्तांकडे जाईल. अहवालात नेमके काय निष्कर्ष येतील? आरोप कितपत खरे ठरतील? प्रशासन कोणती कारवाई सुचवेल? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.











