अमरावती : आधारभूत किंमत खरेदी योजनेत भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकरी बांधवांची नोंदणी करण्यासाठी आता दि. 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अमरावती यांनी केले आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात अचलपूर, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार व चांदूर रेल्वे या पाच तालुक्यात खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत. शेतकरी नोंदणी करतांना या हंगामापासून ज्या शेतकऱ्यांचा 7/12 आहे, त्या शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्या शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.