बारामती : राज्य शासनाचे रीड टू मी हे अॅप वापरण्यात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या वाचनाची गोडी लागावी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाचे वाचन करावे, यासाठी शासनाने इंग्लिश हेल्पर संस्थेच्या वतीने ’रीड टू मी’ हे मोबाईल अॅप विकसित करून प्रत्येक शाळेत ते शिक्षकांनी वापरावे, यासंदर्भात मार्गदर्शन करून सूचना दिल्या. पुणे जिल्ह्यात आजपर्यंत बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी शाळा सर्वाधिक अॅप वापरणारी ठरली असून, या शाळेचा गटशिक्षणाधिकारी संपतराव गावडे यांच्या हस्ते मुख्याध्यापक कुमुदिनी काळभोर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासन व इंग्लिश हेल्पर संस्थेच्या वतीने इंग्रजी भाषेवर विद्यार्थ्यांना प्रभुत्व संपादन करता यावे, यासाठी ’रीड टू मी’ हे अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शब्दसंपत्तीत व वाचनात लक्षणीयरीत्या प्रगती झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी गावडे, पुणे डायट व इंग्लिश हेल्पर संस्थेच्या वतीने संदीप मंडलिक, केंद्रप्रमुख विश्वास बागडे, ’रीड टू मी’ तालुका समन्वयक वैशाली शेळके, विषय साधन व्यक्ती सागर गायकवाड, पाहुणेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच भगवानराव तावरे, ग्रामसेविका अवंती चव्हाण, शाळा व्यवस्थापन सदस्या साधना परकाळे व मुख्याध्यापिका कुमुदिनी काळभोर उपस्थित होते. सदर इंग्रजी वाचन उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक उत्तम जगताप, ज्योती देवकर, अनिता गायकवाड, सुनीता नरुटे, शिल्पा करंजे, रवींद्र भिसे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.


